Video : क्रूरतेचा कळस!! डॉक्टरने निष्पाप कुत्र्याला गाडीला बांधून नेले फरफटत

तब्बल पाच किलोमीटर पर्यंत कुत्र्याला फरफटत नेल्याची माहिती समोर आली आहे

Updated: Sep 18, 2022, 11:46 PM IST
 Video : क्रूरतेचा कळस!! डॉक्टरने निष्पाप कुत्र्याला गाडीला बांधून नेले फरफटत title=

राजस्थान : गेल्या काही दिवसांपासून देशभरात कुत्र्यांच्या (stray dog) हल्ल्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये पाळीव कुत्र्यांपासून भटक्या कुत्र्यांचाही समावेश आहे. या घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत. अशातच आता एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

राजस्थानच्या जोधपूरमधील (Jodhpur) एक डॉक्टर (doctor) गाडीतून कुत्र्याला दोरीने ओढून घेऊन जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. डॉक्‍टरच्‍या घरात हा कुत्रा घुसला होता, यामुळे संतापून डॉक्‍टरने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. यादरम्यान काही दुचाकीस्वारांनी कुत्र्याचा जीव वाचवत आणि डॉक्टरांविरोधात एफआयआर दाखल केलाय.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

डॉक्टर रजनीश गालवा ( Dr. Rajneesh Galwa) यांच्या घरात कुत्रा घुसला तेव्हा त्यांनी कुत्र्याला प्लास्टिकच्या दोरीने बांधले आणि त्याला कारमधून पाच किलोमीटरपर्यंत ओढत नेले. दरम्यान, डॉक्टर. रजनीश यांच्या कारच्या मागून येणाऱ्या दुचाकीस्वारांनी कार थांबवून भटक्या कुत्र्याला रुग्णवाहिकेतून पशुवैद्यकीय रुग्णालयात नेले. तेथे रक्तस्त्राव झालेल्या कुत्र्यावर उपचार करण्यात आले.

मनेका गांधी यांच्याकडून गुन्हा दाखल

डॉक्टर रजनीश गालवा यांनी सर्वप्रथम आपल्या डॉक्टर सहकाऱ्यांना घटनास्थळी बोलावले आणि तरुणांना मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान, तरुणांनी डॉक्टर रजनीश गालवा यांच्याविरोधात शास्त्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र डॉक्टर रजनीश गालवा यांच्याविरोधात पोलीस गुन्हा नोंदवत नव्हते.

दरम्यान, या तरुणांनी मनेका गांधी (maneka gandhi) यांना दिल्लीत या प्रकरणाची माहिती दिली. मनेका गांधी (maneka gandhi) यांनी शास्त्रीनगर पोलीस स्टेशनच्या स्टेशन ऑफिसरला फोन केला. त्यानंतर डॉ. रजनीश गालवा यांच्याविरुद्ध प्राणी क्रूरतेअंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला. डॉ. रजनीश गालवा हे एसएन मेडिकल कॉलेजमध्ये तैनात असून ते प्लास्टिक सर्जन आहेत.