श्रीनगर : जम्मू-कश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात बुधवारी सुरक्षा दलाकडून करण्यात आलेल्या गोळीबारात तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलंय. उल्लेखनीय म्हणजे, यानंतर जम्मू-कश्मीर पोलिसांकडून बारामुल्ला जिल्ह्यात आता एकही स्थानिक दहशतवादी उरला नसल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तब्बल २९ वर्षांनंतर हे शक्य झालंय. जम्मू-कश्मीर पोलिसांकडून बारामुल्ला जिल्ह्याला 'दहशतवादविरहीत क्षेत्र' म्हणून घोषित करण्यात आलंय.
जम्मू-कश्मीर पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार, बारामुल्लासह श्रीनगरमध्येही स्थानिक दहशतवादी नाहीत. परंतु श्रीनगरमध्ये बाहेरील जिल्ह्यातील तसेच विदेशातील दहशतवाद्यांच्या कुरापती सुरूच आहेत.
बुधवारी सुरक्षा दलाकडून जम्मू-कश्मीरच्या बारामुल्लामध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सुरक्षा दलाकडून बारामुल्लामधील बिन्नेर भागाला घेराव घालण्यात आला. त्यानंतर पुढील शोधमोहीम सुरू करून कारवाई करण्यात आली.
शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. त्यानंतर दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक सुरू झाली. दहशतवादी लपलेल्या भागातून काही हत्यारे तसेच अन्य सामग्री जप्त करण्यात आली आहे. मारले गेलेले दहशतवादी लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी निगडीत होते. हे दहशतवादी उत्तर कश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी होते, अशी माहिती मिळतेय.