नोकरीसाठी मुलाने दिली बापाच्या हत्येची सुपारी; पित्यावर गोळीबारही केला, मग...

Jharkhand Crime : झारखंडमध्ये एका मुलानेच नोकरीसाठी वडिलांची हत्या करण्याचा कट रचल्याचे समोर आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुलाला अटक केली असून हल्लेखोरांचा शोध सुरु केला आहे.

आकाश नेटके | Updated: Nov 20, 2023, 02:12 PM IST
नोकरीसाठी मुलाने दिली बापाच्या हत्येची सुपारी; पित्यावर गोळीबारही केला, मग... title=

Crime News : झारखंडमध्ये (Jharkhand Crime) नात्याला काळीमा फासणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. झारखंडच्या रामगडमध्ये एका मुलाने स्वतःच्या वडिलांच्या हत्येची सुपारी दिल्याचे समोर आलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मुलाने ज्यांना हत्येची सुपारी दिली होती त्यांनी पित्यावर हत्या केला. या हल्ल्यात पिता गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतल्यानंतर हे सगळं करण्यामागचं कारण समोर आलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

झारखंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेडच्या कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी त्याच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळवण्यासाठी आरोपीने वडिलांच्या हत्येचा प्रयत्न केला आणि त्यासाठी हल्लेखोरांना पैसे दिले होते. पोलिसांच्या तपासात हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. सीसीएल कर्मचारी रामजी मुंडा यांच्यावर 16 नोव्हेंबर रोजी रामगढ जिल्ह्यातील मतकामा चौकात मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर रामजी मुंडा या तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानतंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. तपासादरम्यान पोलिसांना त्यांचा मुलगा अमित मुंडा याच्याकडे चौकशी करण्यात आली. त्यावेळी पोलिसांना त्याची वागणूक संशयास्पद वाटली. त्यामुळे अमित मुंडाकडे कसून चौकशी करण्यात आली. या गुन्ह्यात त्याचा सहभाग आढळून आल्याने पोलिसांनी अमित मुंडाला अटक केली. रामजी मुंडा यांचा मुलगा अमित मुंडा याने अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळवण्यासाठी आणि जुनी मालमत्ता मिळवण्यासाठी हल्लेखोरांला पैसे दिले होते, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी बिरेंद्र कुमार चौधरी यांनी दिली.

वडिलांना मारण्यासाठी मुलाने सुपारी दिली 

संध्याकाळी चार वाजता घराजवळ हल्लेखोरांनी रामजी मुंडा यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. पोलिसांना घटनास्थळी सात एमएमचा शेलही सापडले होते आहे. रामजी मुंडा यांचा मोठा मुलगा अमितकुमार मुंडा याने वडिलांची जमीन आणि नोकरी मिळवण्यासाठी वडिलांच्या हत्येचा कट रचला होता. त्यासाठी त्याने चार लाख रुपये हल्लेखोरांना दिले होते. अमितने या घटनेत आपला सहभाग मान्य केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, हल्लेखोरांना पकडण्यासाठी कारवाई सुरू करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल) ची उपकंपनी असलेल्या सीसीएलमध्ये एखाद्या कर्मचाऱ्याच्या सेवेच्या कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या अवलंबितांना कायमस्वरूपी नोकरी देण्याची तरतूद आहे.