Kulgam Encounter News: (Jammu Kashmir) जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया कमी होण्याचं नाव घेत नसून आता समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आणि देशाच्या संरक्षणाला धक्का देणाऱ्या या घटकांचा नायनाट करण्यासाठी आता लष्कर आणि स्थानिक पोलीस दलानं कंबर कसली आहे. दहशतवादविरोधी कारवायांना वेग देणाऱ्याच याच संरक्षण दलांनी नुकताच जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील एका गावात लपून बसलेल्या 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. धक्कादायक बाब म्हणजे या दहशतवाद्यांनी कुलगाममध्येच एका घरात आसरा घेतला होता.
घरात, जवळच कपाट असल्याचं भासवत त्याच्या आड बांधण्यात आलेल्या बंकरमध्ये या दहशतवाद्यांनी आसरा घेतला होता. संरक्षण दलांनी Anti Terrorist मोहिमेअंतर्गत हाती घेतलेल्या मोहिमेअंतर्गत सुगावा लागताच तातडीनं हा बंकर शोधला आणि तो पाहताच अनेकांना धक्का बसला. कुलगामच्या चिन्निगाम येथे खात्मा करण्यात आलेले हे दहशतवादी हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
कुलगाममधील गावात तयार करण्यात आलेल्या या बंकरमध्ये दीर्घ काळापासून दहशतवाद्यांनी आसरा घेतला होता. या बंकरमध्ये तळ ठोकून बसलेल्या दहशतवाद्यांनी लष्कराला चकवण्यासाठी एका कपाटाच्या/ वॉर्डरोबच्या आड हे लहानसं पण तितकंच सुरक्षित बंकर बांधलं होतं. सोशल मीडियावर या बंकरचे आणि घटनास्थळाचे काही व्हिडीओ समोर आले असून प्रथमदर्शनी हे बंकर सिमेंट- काँक्रिटचं पक्क बांधकाम असल्याचं सांगण्यात आलं होतं. लष्कराच्या शोधमोहिमांदरम्यान त्यांची दिशाभूल करत इथं दहशतवादी लपून बसत होते अशी माहिती यादरम्यान समोर आली.
Terrorists killed by Indian security forces in Kulgam, South Kashmir were hiding in a well-fortified concrete space behind a wardrobe at a civilian house. 6 Pakistan sponsored terrorists were killed in two separate encounters in Kashmir by Indian Army, J&K Police and CRPF. pic.twitter.com/LxngUXWIa0
— Nehra (@Nehra_Singh80) July 8, 2024
जम्मू काश्मीरमध्ये मागील 48 तासांमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झटापट झाली आणि यामध्ये 6 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात संरक्षण दलाला यश मिळालं. या कारवाईमध्ये दुर्दैवानं एक जवानही शहिद झाल्याची माहिती समोर आली. दरम्यान सदर कारवाई ही एक मोठं यश असून, जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाला थारा नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.