सांबा सेक्टरमध्ये सापडले पाकिस्तानमधून खोदलेले भुयार

जम्मूच्या सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानमधून खोदलेले भुयार सापडले आहे. 

Updated: Aug 29, 2020, 09:49 PM IST
सांबा सेक्टरमध्ये सापडले पाकिस्तानमधून खोदलेले भुयार  title=

श्रीनगर : जम्मूच्या सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानमधून खोदलेले भुयार सापडले आहे. बीएसएफने धडक कारवाई करत भुयार शोधून काढले आहे. पाकिस्तानातून  घुसखोरीसाठी पाकिस्तान लष्कराच्या आशीर्वादाने भुयार खणल्याची शंका उपस्थित करण्यात येत आहे.

भारतामध्ये अतिरेकी घुसवण्यासाठी खणलेलं एक भुयार बीएसएफने शोधून काढले आहे. या भुयाराचा उगम पाकिस्तानातच असल्याचं सज्जड पुरावे मिळाले असून पाकिस्तानी लष्कराच्या आशीर्वादानंच भुयार खणले असावे, अशी शंका घ्यायला वाव आहे. 

भारतामध्ये अतिरेकी घुसवण्यासाठी पाकिस्तान दरवेळी वेगवेगळी शक्कल लढवत असतो.  त्यातला सीमेवरील तारेच्या खालून भूयार खणणं हा नेहमीचाच उद्योग. अशाच एका भुयाराची माहिती मिळाल्यानंतर बीएसएफनं तपास सुरू केला. जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये हे भुयार आढळून आलंय... जमिनीपासून २५ फूट खोल असलेलं हे भुयार थेट पाकिस्तानात निघतंय... सँडबॅग वापरून पद्धतशीरपणे हे भुयार झाकण्यात आलं होतं... मात्र या सँडबॅगनीच पाकिस्तानचा बुरखा फाडलाय. यासाठी सँडबॅग कराचीमधून आणल्याचं स्पष्ट झाले आहे.

 यामुळे हे भुयार पाकिस्तानमधूनच खणण्यात आल्याचं उघड झाले आहे. सीमेवर जशी आपल्या बाजुला गस्त असते, तशीच पाळत पाकिस्तानी रेंजर्सही ठेवतात. त्यांच्या माहितीशिवाय एवढं मोठं भुयार खणणं शक्य नाही. त्यामुळे यात पाकिस्तानी लष्कराचाही हात असल्याचं सिद्ध होत आहे. 

हे भुयार अलिकडे खणण्यात आलं असावं, असा अंदाज बीएसएफनं व्यक्त केलाय. अशी आणखी काही भुयारं या भागात आहेत का, याचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी बीएसएफनं व्यापक मोहीम हाती घेतली असून त्यासाठी ग्राऊंड पेनिट्रेटिंग रडारची मदत घेतली जात आहे.