लष्करी गणवेश परिधान करून दहशतवाद्यांकडून घातपाताची शक्यता; आयबीकडून हायअलर्ट

दिल्लीतही अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

Updated: Aug 12, 2019, 11:19 AM IST
लष्करी गणवेश परिधान करून दहशतवाद्यांकडून घातपाताची शक्यता; आयबीकडून हायअलर्ट title=

नवी दिल्ली: अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर आज जम्मू-काश्मीरमध्ये शांतीपूर्ण वातावरणात बकरी ईद साजरी केली जात आहे. काश्मीरमधली ही शांतता पाहून पाकिस्तान मात्र चवताळला आहे.

त्यामुळे पाकिस्तानकडून दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय गुप्तचर संस्थेने हा इशारा दिला आहे. सहा ते सात अतिरेकी हल्ला करण्यासाठी काश्मिरमध्ये घुसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिल्याचे समजते. 

दहशतवाद्यांनी पुलावामाप्रमाणे लष्करी गणवेश परिधान करून हल्ला करण्याची योजना आखल्याचा अंदाज आहे. दिल्लीतही अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय, स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर घातपात घडवण्यासाठी दहशतवादी प्रयत्नशील आहेत. 

सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने जैशला भारतात हल्ला करण्याची परवानगी दिली आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषीत केलेला मसूद अजहर जैशचा प्रमुख आहे. भारतात दहशतवादी हल्ले करून जास्तीत जास्त लोकांचा बळी घेण्याची सुचना आयएसआयने जैशला दिली आहे. 

त्यामुळे मुंबई-दिल्लीसह देशातील १५ मोठ्या शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, पुणे आणि दिल्लीसह देशातील महत्वाच्या शहरांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे.