जयपूर एक्स्प्रेस फायरिंगनंतर रेल्वेने घेतला मोठा निर्णय, 'यापुढे रेल्वे डब्यात..'

Jaipur Express Firing: मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या महत्वाच्या निर्णयानंतर भारतीय रेल्वेच्या सर्व विभागांसाठी समान सूचना जारी केल्या जाऊ शकतात,अशी माहिती सुत्रांनी दिली.

Pravin Dabholkar | Updated: Aug 4, 2023, 11:50 AM IST
जयपूर एक्स्प्रेस फायरिंगनंतर रेल्वेने घेतला मोठा निर्णय, 'यापुढे रेल्वे डब्यात..' title=

Jaipur Express Firing: जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये झालेल्या गोळीबारात आरपीएफच्या ASI सह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. आरपीएफ जवान चेतन सिंह याने त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासह चारजणांना गोळ्या घातल्या होत्या. या प्रकरणी चेतन सिंहला अटक करुन पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे. त्याची सखोल चौकशी सुरु आहे. असे असले तरीही या घटनेनंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. रेल्वने देखील यासंदर्भात महत्वाची पाऊले उचलली आहेत. 

31 जुलै रोजी घडलेल्या हृदयद्रावक घटनेनंतर रेल्वेने रायफल बाळगण्यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार प्रवासादरम्यान आरपीएफ जवानांना रायफल घेऊन जाण्याची परवानगी देण्यात येणार नाही. याऐवजी ते आता पिस्तुल घेऊन जाऊ शकतात. सध्या मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. 

आम्ही मध्य रेल्वेच्या मुंबई विभागासाठी हा आदेश जारी केला आहे. त्यानुसार एस्कॉर्ट पार्टी आता रायफलऐवजी पिस्तूल बाळगणार आहे, असे मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ऋषी कुमार शुक्ला यांनी सांगितले. 

तर ऑटोमॅटिक असॉल्ट रायफल देण्याचे आदेशही जारी करण्यात आले आहेत. आता एस्कॉर्ट पार्टीला पिस्तुल घेऊनच प्रवास करावा लागेल, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या महत्वाच्या निर्णयानंतर भारतीय रेल्वेच्या सर्व विभागांसाठी समान सूचना जारी केल्या जाऊ शकतात,अशी माहिती सुत्रांनी दिली.

असे असले तरीही आरपीएफ पथकाला दहशतवादी हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी स्टेशनवर आणि नक्षलग्रस्त भागासारख्या अति जोखमीच्या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांमध्ये रायफलसारखी शस्त्रे घेऊन प्रवास करण्याची परवानगी असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये चेतन सिंगसह चार जवानांपैकी दोन जवान 20 राउंड दारूगोळ्यांसह आधुनिक रायफल घेऊन तैनात होते. सहायक उपनिरीक्षक टिकलसिंग मीना आणि अन्य दोघांकडे पिस्तूल होते. दरम्यान चौंघाच्या हत्येमुळे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या धोरणाचा पुनर्विचार करण्यास भाग पाडले आहे.

अवजड शस्त्रांसह प्रवास करण्यासाठी एस्कॉर्ट पार्टीची आवश्यकता यावर चर्चा करण्यासाठी रेल्वे पोलीस आणि आरपीएफ यांच्यात एक बैठक झाली. रेल्वे बोर्डाने स्थापन केलेली पाच सदस्यीय समितीदेखील या समस्येवरही तोडगा काढणार आहे. दरम्यान खूप गर्दीच्या ठिकाणी तैनात असलेल्या आरपीएफ जवानांकडे कोणते शस्त्र द्यावे यावर देखील विचार केला जाणार आहे.