मुंबई: कोरोनामुळे अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम सुविधा कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन सुरू केली होती. त्यातील काही कंपन्यांनी निर्बंध शिथिल होताच 50 टक्क्याने ऑफिस सुरू केले. तर काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण झाल्याचे पाहून पूर्ण ऑफिस सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण आता देशातील बड्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांसाठी एक प्लॅन तयार केला आहे. Work From home करणाऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे.
तुम्ही किंवा तुमच्या आजूबाजूला कोणी TCS, Wipro किंवा Infosys सारख्या कंपन्यांमध्ये काम करत असेल. तर तिथल्या कर्मचाऱ्यांचं वर्क फ्रॉम होम सुविधा बंद होऊ शकते. यासंदर्भात सध्या नियोजन सुरू आहे. या तिन्ही कंपन्यांनी एक योजना तयार केली आहे. त्यानुसार आता कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी ऑफिसमध्ये यावं लागणार आहे. वर्क फ्रॉम होम कल्चर हळूहळू बंद होणार असल्यात या नियोजनानुसार तरी दिसत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार टॉप आयटी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलवण्याचं नियोजन केलं आहे. 70 टक्के कर्मचाऱ्यांचे दोन्ही डोस तर 95 टक्के कर्माचाऱ्यांचा एका डोस पूर्ण झाला आहे. टीसीएसचे चीफ एचआर ऑफिसर मिलिंद लक्कड यांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षाच्या अखेरीस कर्मचाऱ्यांना पुन्हा ऑफिसमध्ये बोलवण्यात येऊ शकतं. त्यासंदर्भात कंपनीचं नियोजन सुरू असल्याचं सांगितलं आहे.
इंफोसिसने आठवड्यातून एक किंवा दोन दिवस कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलवण्यासंदर्भात नियोजन तयार केलं आहे. विप्रो कंपनीतील कर्मचारी 13 सप्टेंबरपासून आठवड्यातून दोन वेळ ऑफिसला येतील अशी सूचना कर्मचाऱ्यांना दिली होती. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात येईल असंही कंपनीच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
एचसीएल टेक्नोलॉजी कंपनी देखील आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून दोन वेळा ऑफिसला बोलवते. तर जे लांबून येणारे आहेत त्यांना एक दिवस कंपल्सरी ऑफिसला यावं लागतं. आणखी काही नियोजनांवर चर्चा सुरू आहे. येत्या काळात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.