Russia Luna 25: रशियाने जवळपास 47 वर्षांनी चंद्रावर आपलं यान पाठवलं आहे. 11 ऑगस्टला सकाळी 4 वाजून 40 मिनिटांनी रशियाने अमूर ओब्लास्टच्या वोस्तोनी कॉस्मोड्रोम येथून Luna-25 Lander मिशन लाँच करण्यात आलं. हे लाँचिंग 2.1 बी (Soyuz 2.1b) रॉकेटच्या सहाय्याने करण्यात आलं आहे. याला लूना ग्लोब मिशन असंही म्हटलं जात आहे. दरम्यान रशियाने मिशन लाँच केल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने अभिनंदन केलं आहे.
भारतानंतर आता रशियानेही चंद्रमोहीम सुरु केली आहे. रशियाने चांद्रयान मोहिमेसाठी Luna-25 ला यशस्वीपणे लाँच केलं आहे. भारताच्या चांद्रयान-3 नंतर तब्बल एका महिन्याने रशियाने मिशन लाँच केलं आहे. पण भारताआधी रशिया चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिग करण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये प्रथम लँडिग करण्याची स्पर्धा असेल. विशेष म्हणजे रशिया तब्बल 47 वर्षांनी चंद्रावर लँडर उतरवत आहे.
रशियाचं रॉकेट 46.3 मीटर लांब आहे. याची घनता 10.3 मीटर इतकी असून, वजन 313 टन आहे. चार टप्प्यांमधील या रॉकेटने Luna-25 लँडरला पृथ्वीच्या बाहेर एका गोल ऑर्बिटमध्ये सोडलं आहे. यानंतर यान चंद्राच्या दिशेने झेपावलं आहे. या प्रवासात 5 दिवस लागणार आहेत यानंतर यान चंद्राच्या भोवताली 7 ते 10 दिवस फिरणार आहे.
रशियाने यशस्वीपणे मिशन लाँच केल्यानंतर इस्रोने ट्विटरच्या माध्यमातून त्यांचं अभिनंदन केलं आहे. "Luna-25 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल रोसकॉसमॉसचे अभिनंदन. आपल्या अंतराळ प्रवासात आणखी एक भेटीची जागा मिळाल्याचा आनंद आहे. चांद्रयान-३ आणि लुना-२५ मोहिमांना त्यांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी शुभेच्छा," असं इस्रोने ट्विटमध्ये म्हटलं आहे.
21 किंवा 22 ऑगस्टला Luna-25 चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिग करणार आहे. याचा लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून 18 किमी उंचावर पोहोल्यानंतर लँडिग प्रक्रिया सुरु करणार आहे. सुमारे 15 किमी उंची कमी केल्यानंतर, 3 किमी उंचीवरून धीम्या गतीने लँडिग करण्याचा प्रयत्न असेल. 700 मीटर उंचीवरुन थ्रस्टर्स वेगाने सुरु होतील आणि त्याची गती कमी करतील. 20 मीटर उंचीवर इंजिन धीम्या गतीने चालेल, जेणेकरुन लँडिंग व्हावी.
Luna-25 वर्षभर चंद्राच्या पृष्ठभागावर काम करणार आहे. याचं वजन 1.8 टन आहे. यामध्ये 31 किलोचं वैज्ञानिक यंत्र आहे. हे यंत्र पृष्ठभागावर खोदकाम करत दगडं आणि मातीचे नमुने घेणार आहे. जेणेकरुन गोठलेल्या पाण्याची माहिती मिळवता येईल. म्हणजे भविष्यात जेव्हा कधी चंद्रावर आपलं तळ निर्माण करेल, तेव्हा तिथे पाण्याची व्यवस्था केली जाऊ शकते.