ISRO Chief S Somanath On Temple Visit: 23 ऑगस्ट 2023 हा दिवस जगाच्या इतिहासामध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं म्हणजेच इस्रोनं केलेल्या कामगिरीमुळे सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला. संपूर्ण जगातून भारतावर आणि भारतीय अंतराळ संस्थेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. चंद्रावर यशस्वीपणे लँडिंग करणारा भारत हा चौथा तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. भारताच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर देशभरामध्ये जणू दिवाळी साजरी करण्यात आली. या कामगिरीच्या वेळी 'ब्रिक्स'च्या परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थेट बंगळुरुमध्ये दाखल झाले. इस्रो ऑफिसला भेट देऊन मोदींनी शास्त्रज्ञांचं कौतुक केलं. या सर्व घडामोडींनंतर रविवारी इस्रोचे प्रमुख के. सोमनाथ यांनी तिरुवनंतपुरममधील भद्रकाली देवीचं दर्शन घेतलं. यावेळेस त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी मंदिरामध्ये दर्शनाला जाण्याबरोबरच 'शिवशक्ती' या नावासंदर्भातही आपलं मत व्यक्त केलं.
सोमनाथ यांना मंदिरांमध्ये भेटीसंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना इस्रोच्या प्रमुखांनी, "मी एक शास्त्रज्ञ आहे. त्यामुळेच शोध घेणं हे माझं काम समजतो. मी चंद्राबाबत शोध घेतोय अगदी त्याचप्रमाणे अध्यात्माचाही शोध घेत आहे. विज्ञान असो की अध्यात्म असो मला नवनव्या गोष्टींबद्दल शोध घेणं आवडतं. हाच शोध घेण्यासाठी मी मंदिरांमध्ये जातो, धर्मग्रंथही वाचतो," असं आपल्या धार्मिक श्रद्धेबद्दल सोमनाथ यांनी सांगितलं. "आपल्या ब्रह्मांडाचा शोध घेण्याप्रमाणेच आपल्या अस्तित्वाचा शोधही आवश्यक आहे. मंदिरं ही आपल्या संस्कृतीचा भाग आहेत. ब्रह्मांडात दडलेल्या गोष्टींचा शोध घेण्यासाठी शास्त्रीय प्रयोग आवश्यक आहेत. पण आत्म्याला शांतता मिळावी म्हणून मंदिरात जाणं आवश्यक आहे," असं ही सोमनाथ यांनी धार्मिक श्रद्धेबद्दल आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलं.
चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जिथं उतरलं त्या टचडाऊन पॉईंटला 'शिवशक्ती' नाव देण्यात येत असल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली. या नावावरुन उलटसुलट चर्चा सुरु असतानाच सोमनाथ यांनी या नावाचं समर्थन केलं आहे. "शिवशक्ती नाव ठेवण्यात चुकीचं काहीही नाही, असं सोमनाथ यांनी म्हटलं आहे. "शिवशक्ती आणि तिरंगा ही दोन्ही भारतीय नावं आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचा अर्थही सविस्तरपणे सांगितला आहे. आपण जे काही करतो आहोत त्याचं एक महत्त्व आहे आणि सहाजिक आहे ते असलंच पाहिजे. देशाचे पंतप्रधान या नात्याने टचडाऊन पॉईंटला नाव देणं हा त्यांचा विशेषाधिकार आहे. शिवशक्ती या नावात काहीच गैर वाटत नाही," असं सोमनाथ यांनी सांगितलं आहे.
#WATCH | On his visit to Pournamikavu, Bhadrakali Temple in Thiruvananthapuram, ISRO Chairman S Somanath says, "I am an explorer. I explore the Moon. I explore the inner space. So it's a part of the journey of my life to explore both science and spirituality. So I visit many… pic.twitter.com/QkZZAdDyX3
— ANI (@ANI) August 27, 2023
चांद्रयान-3 मधील रोव्हर आणि लँडर उत्तमप्रकारे काम करत असून त्याच्याकडून आपल्याला 3 सप्टेंबरपर्यंत माहिती मिळत राहणार आहे असं सोमनाथ यांनी यावेळेस बोलताना स्पष्ट केलं.