नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंतांपैंकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांच्या मुलानंतर आता मुलीचा साखरपुडा पार पडतोय. ईशा अंबानी हिचा साखरपुडा उद्योगपती अजय पीरामल यांचा मुलगा आनंद पीरामल याच्यासोबत शुक्रवारी (21 सप्टेंबर) इटलीमध्ये आयोजित करण्यात आलाय. हा सोहळा खास होण्यासाठी तयारी पूर्ण झालीय. आजपासून सुरू होणारा हा ग्रॅन्ड सोहळा तीन दिवस चालणार आहे.
साखरपुड्याचा सोहळा इटलीच्या लेक कोमो, लोम्बार्डीमध्ये पार पडेल. अंबानी कुटुंबासाठी हा क्षण खुपच खास असेल. या सोहळ्यात लंच - डिनरसहीत डान्स इव्हेंटचाही समावेश आहे.
शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता लेक कोमोच्या बेलबियानो विला (Vill Balbiano) मध्ये निमंत्रितांसाठी खास डिनरचं आयोजन करण्यात आलंय. पार्टीत ब्रेकफास्टपासून डिनरपर्यंत आयोजनाला खास नावं दिली गेलीत. वेलकम लंचला 'Benvenuti A Como' नाव दिलं गेलंय. याचाच अर्थ कोमोमध्ये स्वागत आहे. डिनरला नावं दिलं गेलंय 'Amore E Bellezza' याचा अर्थ आहे 'लव्ह अॅन्ड ब्युटी'
मे महिन्यात ईशा आणि आनंदसाठी दोन्ही कुटुंबांच्या उपस्थितीत एक खास सोहळाही आयोजित करण्यात आला होता. याच दरम्यान ईशाचा जुळा भाऊ आकाश अंबानीचा साखरपुडा श्लोका मेहता हिच्यासोबत झाला होता. त्यानंतर कुटुंबानं मुलीच्या लग्नाची घोषणाही केली होता.
आनंद पीरामल हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून ग्रॅज्युएट आहे... आणि सध्या तो पीरामल एन्टरप्राईजचा एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर आहे.
इटलीतील लेक कोमो स्थित व्हिला डेल बालबियानेलोमध्ये जगातील अनेक सेलिब्रटीज आणि श्रीमंतांनी विवाह सोहळे आयोजित केलेत. नुकतंच बॉलिवूड कपल दीपिका आणि रणवीर यांच्या लग्नाबद्दल चर्चा सुरू असताना 'लेक कोमो' नावाची जोरदार चर्चाही झाली होती.