Interesting Facts : रात्रीच्या वेळी रेल्वेगाड्या भरधाव वेगात का धावतात?

Indian Railway : रेल्वेनं रात्रीच्या वेळी प्रवास केला असेल तर एक बाब लक्षात येते की, सकाळच्या तुलनेत रात्री रेल्वेचा वेग वाढलेला असतो. याचं कारण काय? 

सायली पाटील | Updated: Mar 18, 2024, 03:32 PM IST
Interesting Facts : रात्रीच्या वेळी रेल्वेगाड्या भरधाव वेगात का धावतात?  title=
interesting facts indian railway Why do Trains Run Faster at Night

Indian Railway : भारतीय रेल्वे विभागाच्या माहितीनुसार रविवारी रात्री साबरमती- आग्रा सुपरफास्ट एक्सप्रेस या रेल्वेगाडीचे 4 डबे रुळावरून घसरले. राजस्थानातील अजमेर येथे हा भीषण अपघात झाला. सुदैवानं यामध्ये जीवित हानी झाली नाही. इथं एक मोठं संकट टळलेलं असताना दुसरीकडे मात्र रेल्वे सुपरफास्ट म्हणजे नेमकी किती वेगानं धावत असेल? त्यातही अपघात झाला ती रात्रीची वेळ म्हणजे वेग तुलनेनं जास्तच... असे अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित करण्यात आल्या. 

अपघाताचा मुद्दा  बाजुला ठेवून परिस्थिती पाहिल्यासही रेल्वेगाड्यांचा रात्रीचा वेग तुलनेनं जास्तच असतो हे नाकारता येत नाही. भारतीय रेल्वेच्या असंख्य माध्यमांतून दर दिवशी लाखो प्रवासी  प्रवास करतात. अनेकांचं प्राधान्य रात्रीच्या रेल्वेगाड्यांना असतं. रात्रीच्या वेळी रेल्वे गाड्यांचा वेग जास्त असल्यामुळं किमान वेळात कमाल प्रवास साध्य होतो. पण, असं नेमकं का?  रात्रीच्या वेळी रेल्वे गाड्या इतक्या वेगात का धावतात तुम्हाला माहितीये? जाणून घ्या त्यामागची कारणं. 

सिग्नल 
रात्री रेल्वे ला कमी सिग्नल लागतात. ज्यामुळं ती वारंवार थांबत नाही. परिणामी रात्री रेल्वेचा वेग जास्त असतो. 

मेंटेनेंस 
रात्रीच्या वेळी रेल्वे रुळांच्या देखभालीचं काम तुलनेनं बऱ्याच अंशी कमी असतं. त्यामुळं रेल्वेगाड्यांच्या मार्गात अडथळे येत नाहीत. 

प्राण्यांचा धोका 
दिवसाच्या तुलनेत रात्री रेल्वे रुळांवर कोणतेही प्राणी येण्याची शक्यता कमी असते. त्यामुळं हा धोकाही टळतो. रेल्वेचा वाढलेला वेग हवामान, रेल्वेचा प्रकार या घटकांवरही अवलंबून असतो. 

तापमान 
रात्रीच्या वेळी दिवसाच्या तुलनेक कमी तापमान असल्यामुळं रेल्वे रुळांचं घर्षण कमी होऊन रेल्वे वेगानं धावते. शिवाय दिवसाच्या तुलनेक रात्री रेल्वेची संख्याही कमी असते. त्यामुळं एखाद्या रेल्वेमुळं दुसऱ्या रेल्वेगाडीचा खोळंबा होत नाही. किंवा तशी परिस्थिती फार कमी वेळेस उदभवते. 

हेसुद्धा वाचा : तुमचं बँक खातं सुरक्षित आहे ना? RBI च्या एका इशाऱ्यानं अनेकांनाच खडबडून जाग 

वरील कारणं आणि त्याला जोड देणारी इतरही काही तांत्रिक कारणं रात्रीच्या वेळी रेल्वेगाडीचा वेग वाढण्यामागचं कारण ठरतात. लांब पल्ल्याचा प्रवास करत असताना तुम्हालाही रात्रीच्या प्रवासाची संधी मिळाली तर, रेल्वेच्या वेगामध्ये जाणवणारा हा फरक नक्की पाहा.