India's Most Powerful People : पंतप्रधान मोदीच सर्व शक्तीशाली, उद्धव ठाकरे, शरद पवार, फडणवीस कितव्या स्थानावर?

भारतातील 100 शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत. वाचा इतर भारतीय कोणत्या स्थानावर

Updated: Mar 31, 2022, 12:29 PM IST
India's Most Powerful People : पंतप्रधान मोदीच सर्व शक्तीशाली,  उद्धव ठाकरे, शरद पवार, फडणवीस कितव्या स्थानावर? title=

India's Most Powerful People : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची लोकप्रियता सातत्याने वाढत असून देशातील 100 शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत (Most Powerful Indians) ते पहिल्या क्रमांकावर आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath), सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat), भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (J P Nadda) आणि सपा प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh यांचाही या यादीत समावेश आहे.

मोदींच्या लोकप्रियतेची 'ही' आहेत कारणं
इंडियन एक्स्प्रेसने भारतातील टॉप 100 शक्तीशाली व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अव्वल स्थानावर आहेत. कोरोना महामारीमुळे देशात उद्भवलेलं संकट आणि त्यावरील लसीचं व्यवस्थापन, विधानसभा निवडणुकीत भाजपची मजबूत झालेली स्थिती यामुळे पंतप्रधान मोदींची प्रतिमा उंचावली आहे. याशिवाय, अलीकडेच, युद्धग्रस्त युक्रेनमधून 22 हजारहून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी झालेले प्रयत्न, यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. 

अमित शहा दुसऱ्या क्रमांकावर
शक्तीशाली व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान मोदींनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याचबरोबर या यादीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत तिसऱ्या क्रमांकावर असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा चौथ्या क्रमांकावर आहेत. देशातले सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेले मुकेश अंबानी सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत 5 व्या स्थानावर आहेत.

पहिल्या दहामध्ये योगी
नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवणारे योगी आदित्यनाथ 100 शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत सहाव्या स्थानावर आहेत. सीएम योगी यांच्यानंतर या यादीत सातव्या क्रमांकावर उद्योगपती गौतम अदानी, आठव्या क्रमांकावर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, नवव्या क्रमांकावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दहाव्या क्रमांकावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहेत.

राज्यातील नेत्यांचं स्थान कितवं
100 सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचंही नाव आहे, त्या 11 व्या स्थानावर आहेत. दुसरीकडे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 13 व्या, या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 16 व्या स्थानावर आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार १७व्या स्थानी आहेत. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस या यादीत 83 व्या क्रमांकावर आहेत. 

काँग्रेसच्या सर्वोसर्वा सोनिया गांधी 27 व्या, राहुल गांधी 51 व्या आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव 56 व्या स्थानावर आहेत.