रेल्वे रुळावर आणण्यासाठीच्या हालचाली सुरु; आरक्षण प्रक्रियेत बदल

येत्या काळात ठप्प झालेली रेल्वेसेवा आणखी मोठ्या स्तरावर काम करताना दिसेल

Updated: May 29, 2020, 09:57 AM IST
रेल्वे रुळावर आणण्यासाठीच्या हालचाली सुरु; आरक्षण प्रक्रियेत बदल  title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : जवळपास दोन महिन्यांसाठी ठप्प झालेली भारतीय रेल्वे सेवा आता येत्या काळात पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठीचे केंद्र आणि रेल्वे मंत्रालयाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी आवश्यक ते निर्णय आणि नवी नियमावलीसुद्धा टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येत आहे. 

श्रमिक स्पेशल रेल्वे म्हणू नका किंवा मग देशातील विविध भागांमध्ये असणाऱ्या नागरिकांना इच्छित स्थळी पोहोचवण्यासाठीच्या रेल्वे गाड्यांची तरतूद म्हणू नका. टप्प्याटप्प्यानं पावलं उचलत भारतीय रेल्वे खऱ्या अर्थानं रुळावर येऊ लागली आहे. 

सध्याच्या घडीला यातच पुढचं पाऊल म्हणजे रेल्वे मंत्रालयायकडून आरक्षण प्रणालीत करण्यात आलेले काही महत्त्वाचे बदल. १ जूनपासून रेल्वे मंत्रालयाकडून हे नवे नियम लागू करण्यात येणार असून, आरक्षित तिकिटांनीच प्रवास करु इच्छिणाऱ्यांसाठी आता मार्ग मोकळा झाला आहे. यापुढे लांब पल्ल्याच्या रेल्वेने प्रवास करु इच्छिणाऱ्यांसाठी १२० दिवस आधी आगाऊ प्रवासी आरक्षणाची सुविधा उपलब्ध असेल. 

यापूर्वी २२ मे पासून रेल्वे तिकीट आरक्षणाची सुरुवात करण्यात आली होती. ज्यानंतर पुन्हा एकदा रेल्वे मंत्रालयानं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

 

प्रवासाची आखणी करणं सहज शक्य 

तीन महिने आगाऊ तिकीट काढण्याची मुभा असल्यामुळं आता प्रवाशांना त्यांच्या प्रवासाची आखणी करणं शक्य होणार आहे.  तीन महिन्यांसाठी तिकीटाचं आरक्षण करण्यासोबतच करंट सीट बुकींग, तात्काळ कोटा आणि प्रवासादरम्यान येणाऱ्या स्थानांसाठीच्या तिकीट आरक्षणाचीही सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

येत्या काळात जवळपास २३० रेल्वे गाड्यांसाठी ही आरक्षण सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. ज्यासाठी शासनाकडून देशभरात दोन लाखांहून अधिक कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजेच CSC वरुनही तिकीट आरक्षण करण्याची सोय उपलब्ध करुन दिल्याचं कळत आहे. 

देशातील लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मे रोजी पूर्ण होत आहे. ज्यानंतर १ जूनपासून रुळांवर या रेल्वेंची वरदळ वाढलेली असेल. यादरम्यानच श्रमिक रेल्वे सेवाही सुरु असणार आहे. 

एकच नंबर! गल्ली क्रिकेटमधील विचित्र षटकार पाहिला?

 

दरम्यान, रेल्वे प्रवासात सर्व प्रकारची सुरक्षितता पाळली जाणार आहे. ज्यासाठी प्रवाशांनी मुळ वेळेच्या तासभर आधी स्थानकावर येणं अपेक्षित आहे. शिवाय प्रवाशांची होणारी गर्दी पाहता रेल्वे स्थानकांमध्ये प्रवेशासाठी आणि बाहेर पडण्यासाठीचे मार्ग वेगळे करण्यात येणार आहेत. याशिवाय प्रवाशांचं स्क्रीनिंग करण्यात येण्यासोबतच त्यांनी मास्कचा वापर करणं बंधनकारक असणार आहे.