Indian Railways Facilities: बदलतं हवामान, एखादं नैसर्गिक किंवा मानवनिर्मित संकट या आणि अशा काही कारणांनी अनेकदा निर्धारित वेळेत अपेक्षित असणाऱ्या रेल्वेगाड्यांना स्थानकांवर येण्यास विलंब होतो. अनेकदा हा विलंब इतका मोठा असतो, की प्रवाशांवर मनस्तापाची वेळ येते. आता मात्र ही वेळही येणार नाही, कारण अशा सर्वच प्रवाशांसाठी रेल्वेनं एक खास सुविधा आणखी आहे.
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकदा धुक्यामुळं दृश्यमानता कमी होऊनही रेल्वेच्या वेळांमध्ये फरक पडतो. ही बाब जरी अतिसामान्य असली तरीही प्रवाशांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी (IRCTC) आयआरसीटीसीकडून शताब्दी, राजधानी, दुरन्तो (Shatabdi, Rajdhani, and Duronto Express) यांसारख्या प्रिमीयम रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेनं खास सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.
IRCTC च्या कॅटरिंग धोरणानुसार जर एखादी ट्रेन निर्धारित वेळेहून दोन तास उशिरानं धावत आहे, तर प्रवाशांसाठी मोफत आहार दिला जावा. या धोरणानुसार दिवसातील वेळा लक्षात घेता प्रवासी प्राधान्यानं 'मिल'साठी पात्र असतात.
प्रवासाच्या सुरुवातीलाच या प्रवाशांना चहा-बिस्कीटं किंवा कॉफी दिली जाते. प्रत्येक चहा- कॉफीच्या सर्विसमध्ये एक किट येतो. ज्यामध्ये साखर आणि दूधाची पावडर यांचा समावेश असतो. नाश्ता किंवा सायंकाळच्या चहामध्ये सहसा ब्रेड बटर, 200 मिली फ्रूट ड्रिंक, एक कप चहा किंवा कॉफीचा समावेश असतो.
प्रवाशांना आरोग्यदायी आहार देण्यासाठी IRCTC कडून विविध प्रकारचे दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाचे पर्याय दिले जातात. यामध्ये छोले, राजमा, डाळ, भात हा मूळ पर्याय असतो. जेवणासोबत प्रवाशांना लोणचं आणि पर्याय म्हणून मिक्स वेज, पूरी असेही पदार्थ दिले जातात.
रेल्वे अपेक्षित वेळेत येत नसून हा विलंब अधिक असल्यास कस्टमर फ्रेंडली पॉलिसीनुसार तीन तासांहून अधिक उशीर झाल्यास किंवा रेल्वेमार्ग बदलल्यास प्रवाशांनी तिकीट रद्द केलं तर त्यांना पूर्ण पैसे परत देण्याती तरतूद रेल्वेनं केली आहे. हे प्रवासी रिफंड बुकिंग चॅनलच्या माध्यमातून तिकीट रद्द करण्यासाठी विनंती करू शकतात. रेल्वे काऊंटवरून तिकीट बुक केलेल्य़ा प्रवाशांना मात्र तिकीटाची रक्कम परत घेण्यासाठी रेल्वेच्या तिकीट आरक्षण खिडकीपाशी प्रत्यक्ष हजेरी लावावी लागते.
रेल्वेला उशीर झाल्यास जेवण आणि पैसे परत मिळण्याच्या सुविधेशिवाय प्रवाशांना विश्रांतीसाठीच्याही सुविधा दिल्या जातात. प्रवाशांना रेल्वेची प्रतीक्षा करण्यासाठी Waiting Room ची तरतूद करून दिली जाते याशिवाय रेल्वे स्थानकांवर 24 तास खाण्यापिण्याची काही दुकानं सुरू ठेवण्यात येतात. शिवाय प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे सुरक्षा बल अर्थात आरपीएफचे जवानही तैनात असतात.