Indian Railway : धक्कादायक! मिडल बर्थवरील सीट पडून प्रवाशाचा मृत्यू; रेल्वेनं दिलं स्पष्टीकरण...

Indian Railway : रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशाचा मृत्यू.... मिडल बर्थ मानेच्या भागावर पडलं आणि पुढे.... कुठे घडली ही घटना? रेल्वे विभागाचं यावर काय म्हणणं?   

सायली पाटील | Updated: Jun 27, 2024, 11:04 AM IST
Indian Railway : धक्कादायक! मिडल बर्थवरील सीट पडून प्रवाशाचा मृत्यू; रेल्वेनं दिलं स्पष्टीकरण... title=
indian railway Ticket traveller man dies after berth fall on him railway issues clarification viral news

Indian Railway : प्रवाशांचं हित केंद्रस्थानी ठेवत त्याच अनुषंगानं सुविधा आणि तत्सम गोष्टींची आणखी करणाऱ्या रेल्वेमध्ये घडलेल्या एका दुर्घटनेमुळं पुन्हा एकदा रेल्वे डब्यांची, आसनव्यवस्थेची सुस्थिती आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वीच लांब पल्ल्याच्या एका एक्स्प्रेस ट्रेनमध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाल्यानं खळबळ माजली होती. केरळच्या मारनचेरी येथील रहिवासी असणाऱ्या 62 वर्षीय अली खान यांच्यावर मिडल बर्थवरील सीट पडल्यामुळं ते गंभीररित्या दुखापतग्रस्त झाले आणि यामध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू ओढावला. 

रेल्वे प्रवासादरम्यान झालेल्या या अपघातानंतर केरळ काँग्रेसनं केंद्रीय रेल्वेमंत्री आणि मोदी सरकारला निशाण्यावर घेतलं. इथं अनेक स्तरांतून रोष व्यक्त केला जात असतानाच अखेर रेल्वे प्रशासनानं घडल्या अपघातासंदर्भात स्पष्टीकरण जारी केलं. हा अपघात मिडल बर्थमधील बिघाडामुळे झाला नसल्याचं रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं. 

मूळचे केरळचे असणारे अली खान एर्नाकुलम हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्स्प्रेसनं (12645) स्लीपर कोचनं प्रवास करत होते. यादरम्यानच त्यांच्या सीटच्या वर असणाऱ्या मिडल बर्थमध्येही एक प्रवासी प्रवास करत होता. प्रवासासमयी खान यांच्यावर असणारा बर्थ अचानक कोसळला आणि या वजनामुळं ते गंभीररित्या जखमी झाले. या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाला तातडीनं सुचित करत खान यांना लगेचच रेल्वे अधिकाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केलं पण, दुर्दैवानं उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. 

हेसुद्धा वाचा : वाढत्या प्रवासी संख्येचा टेंभा कसला मिरवता; लोकलमधील गुरांसारख्या प्रवासावरून हायकोर्टानं रेल्वे प्रशासनाला झापलं 

कसा घडला अपघात? 

रेल्वे तेलंगणातील वारंगल इथं पोहोचताच मिडल बर्थ सीट अली खान यांच्यावर पडली. ते लोअर बर्थवर झोपलेले असतानाच हा सर्व प्रकार घडला. वरील सीट खान यांच्या मानेवर कोसलळ्यामुळं त्यांच्या मानेला गंबीर दुखापत झाली. त्यांच्यावर रुग्णालयात तातडीनं उपचारही सुरु करण्यात आले, पण, या दुखापतीमुळं त्यांचा मृत्यू झाला. 

घडल्या प्रकारानंतर केरळ काँग्रेसनं 'श्विनी वैष्णव आणि मोदी सरकारच्या काळात रेल्वेची अशी अवस्था आहे, की इथं प्रवाशांना पुरेशी आसनव्यवस्था नाही, रेल्वे नाहीत, तुम्ही सुरक्षित रेल्वेप्रवास करु शकत नाही, बरं रेल्वेत चढता आलं तर बसायला जागा नाही. बसायला मिळालं, तर बर्थ क्रॅश, रेल्वे दुर्घटना, अस्वच्छता अशा कारणांमुळं मृत्यू...', अशा परखड शब्दांमध्ये टीका केली. 

या घटनेनंतर उठलेली टीकेची झोड पाहता रेल्वे विभागानं त्याबाबत स्पष्टीकरण जारी केलं. 'तो अपघात सीटमध्ये बिघाड असल्यामुळं झाला नाही, किंबहुना सीटमध्ये बिघाड नव्हता. रेल्वे अधिकाऱ्यांनी याबाबत तपास केला असता अशी माहिती समोर आली, की मिडल बर्थवर बसलेल्या व्यक्तीनं सीटची चेन व्यवस्थित लावली नव्हती. पीडित खान एस6 च्या 57 क्रमांकाच्या सीटवर प्रवास करत होते. ही लोअर बर्थची सीड होती. वरील बर्थवर असणाऱ्या व्यक्तीनं चेन व्यवस्थित लावली नव्हती, त्यामुळं प्रवासादरम्यान सीट उघडली आणि कोसळली. यामध्ये सीटचा बिघाड किंवा खराब सीट हे या अपघातामागचं कारण नव्हतं', असं रेल्वेनं स्पष्ट केलं.