Indian Railway Rules : जगातील चौथ्या क्रमांकाचं रेल्वेचं जाळं असणाऱ्या भारतीय रेल्वेकडून सातत्यानं प्रवाशांसाठी काही महत्त्वाच्या नियमांची आखणी केली जाते. प्रवास सुकर व्हावा आणि त्यात अडचणी येऊ नयेत यासाठीच रेल्वे विभाग प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळतं. मग ते रेल्वे डब्यांमध्ये देण्यात येणारी सुविधा असो किंवा रेल्वे तिकीट आरक्षण प्रक्रिया अधिक सोपी करणं असो.
एकिकडे रेल्वे विभाग काळानुरूप आणि बदलच्या तंत्रज्ञानाच्या अनुषंगानं कार्यपद्धतीत बदल करत असतानाच या नियमांचं पालन करणं ही प्रवाशांची जबाबदारी ठरते. पण, असं न झाल्यास मात्र प्रवाशांना कारवाईचा सामना करावा लागू शकतो. असाच एक सर्वसाधारण नियम तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. असं न केल्यास लहानशी चूकसुद्धा तुम्हाला महागात पडू शकते.
प्रवासासाठीच्या ट्रेनची वेळ सकाळची असल्यास तुम्ही जास्ती जास्त दोन तासांपूर्वी रेल्वे स्थानकावर पोहोचू शकता. पण, ट्रेन रात्रीची असेल तर मात्र तुम्ही सहा तास आधीही रेल्वे स्थानक गाठू शकता. या वेळेत कधीही स्थानकावर या, तुम्हाला दंड ठोठावला जाणार नाही. इथं तुम्हाला फक्त टीटीईनं विचारल्यास त्यांना वैध तिकीट दाखवावं लागेल. पण, निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ तुम्ही थांबल्यास मात्र तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीटाची गरज भासू शकते.
सहसा एखाद्या दूरच्या ठिकाणी प्रवासासाठी जायचं असेल, तर आपण वेळेच्या आधीच रेल्वे स्थानकावर, त्याहूनही फलाटावर / प्लॅटफॉर्मवर जातो. यावेळी आपल्याकडे तिकीट आहे, त्यामुळं कोणीही काहीही कारवाई करणार नाही असाच आपला समज असतो. एखाद्या तिकीटानुसार तुम्ही ठराविक वेळेतच प्लॅटफॉर्मवर थांबू शकता. त्यामुळं वेळेच्या आधी किंवा वेळेनंतर तुम्ही तिथं आढळलात आणि टीटीईच्या कचाट्यात सापडलात तर मात्र तुमच्याकडून दंड आकारला जाभ शकतो. त्यामुळं ही बाब कायम लक्षात ठेवा.
रेल्वेनं प्रवास करत असताना काही लहानसहान गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. पण, याच लहानसहान गोष्टी नकळतपणे इतका मोठा प्रभाव करतात की त्यानंतर पश्चातापावाचून दुसरा कोणताही पर्याय आपल्याकडे उरत नाही. त्यामुळं प्रवासात अशी पंचाईत ओढावण्यापेक्षा एक सजग प्रवासी असणं कधीही उत्तम.