रेल्वेचा मोठा निर्णय! AC आणि स्लीपर कोचमधील झोपण्याचे नियम आणि वेळा बदलल्या

Indian Railways Rules: रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंतची वेळ झोपण्यासाठी चांगली मानली जाते. जर तुम्हीही ट्रेनमधून प्रवास करत असाल तर झोपण्याच्या या नियमाचं नक्की पालन करा.   

शिवराज यादव | Updated: Jul 19, 2023, 03:47 PM IST
रेल्वेचा मोठा निर्णय! AC आणि स्लीपर कोचमधील झोपण्याचे नियम आणि वेळा बदलल्या title=

Railways New Rule For Passengers: जर तुम्हीदेखील ट्रेनने प्रवास करत असाल तर ही तुमच्या कामाची बातमी आहे. रेल्वेने ट्रेनमधील झोपण्याच्या वेळांमध्ये बदल केला आहे. याआधी रात्रीच्या वेळी प्रवास करताना जास्तीत जास्त नऊ तास झोपण्याची परवानगी होती. पण आता ही वेळ कमी करण्यात आली असून, फक्त आठ तास करण्यात आली आहे. 

याआधी प्रवाशांना एसी कोच आणि स्लीपरमधून प्रवास करताना रात्री 9 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत झोपण्याचा परवानगी होती. पण आता रेल्वेने या नियमात बदल केला आहे. रेल्वेच्या बदललेल्या नियमानुसार, आता रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंतच झोपू शकता. म्हणजेच झोपण्याची वेळ आता कमी करुन 8 तास करण्यात आली आहे. ज्या ट्रेन्समध्ये झोपण्याची व्यवस्था आहे, तिथेच हा नियम लागू होणार आहे. 

प्रवासी फार काळापासून करत होते तक्रार

प्रवाशांना चांगली झोप मिळण्याच्या हेतूने रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. रात्री 10 ते सकाळी 6 ही झोपण्यासाठी चांगली वेळ मानण्यात येते. जर तुम्हीदेखील ट्रेनमधून प्रवास करत असाल तर या वेळेचं पालन करा. यामुळे तुम्ही आणि तुमचे सहप्रवासीही चांगली झोप घेऊ शकतील.

लोअर बर्थवर प्रवास करणारे अनेक प्रवासी गेल्या काही काळापासून तक्रार करत होते. मिडल बर्थचे प्रवासी रात्री लवकर आणि सकाळी उशिरापर्यंत झोपतात अशी त्यांची तक्रार होती. यामुळे खालच्या सीटवर बसलेल्या प्रवाशाला त्रास होतो. यातून अनेकदा प्रवाशांमध्ये वादही होतात.

...तर होणार कारवाई

रेल्वेने या तक्रारींची दखल घेत झोपण्याच्या नियमात आणि वेळेत बदल केला आहे. नव्या नियमानुसार, मिडल बर्थचा प्रवासी रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंतच झोपू शकतो. यानंतर मात्र त्या प्रवाशाला झोपण्याची परवानगी नसेल. त्याला आपली सीट खाली घ्यावी लागेल. 

नियमानुसार, मधील सीटचा प्रवासी रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंतच आपली सीट वरती ठेवू शकतो. याच्या आधी किंवा नंतर तुम्ही त्याला असं करण्यापासून रोखू शकता. जर एखाद्याने त्याची मधली सीट खाली कऱण्यास नकार दिला तर त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकते. 

नव्या नियमानुसार, खालील सीटवर बसून प्रवास करणारे प्रवासीही 10 च्या आधी आणि 6 वाजल्यानंतर सीटवर झोपण्याचा प्रयत्न करु शकत नाहीत. जर एखादा प्रवासी नियमाचं उल्लंघन करत असेल तर त्याची तक्रार केली जाऊ शकते.