Rajnath Singh : देशात लोकसभा निवडणुकांची तयारी सुरु असतानाच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मोठं विधान केलं आहे. सरकार देशातील शांतता भंग करणाऱ्यांना सोडणार नाही असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. देशात गुन्हे करुन सीमेवर जाऊन लपणाऱ्या कोणत्याही दहशतवाद्याला भारत पाकिस्तानात घुसून मारणार असा इशाराही राजनाथ सिंह यांनी दिला आहे. भारताला शेजारी देशांसोबत चांगले संबंध ठेवायचे आहेत पण मात्र भारताला कोणी आव्हान देऊन दहशतवादी कारवाया केल्यास त्याला सोडले जाणार नाही, असेही राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना राजनाथ सिंह यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. राजनाथ सिंह यांनी 'द गार्डियन' या ब्रिटिश वृत्तपत्राच्या अहवालावरही यावेळी भाष्य केलं. या अहवालामध्ये भारताने पाकिस्तानमध्ये लोकांच्या हत्या केल्याचा दावा केला. गार्डियनने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयएच्या अधिकाऱ्यांचा हवाला देऊन दावा केला की भारताने 'ज्यांना आपले शत्रू मानलं होतं त्यांना लक्ष्य करण्याचे धोरण राबवले आणि 2019 च्या पुलवामा हल्ल्यापासून भारतीय गुप्तचर संस्थेने भारताविरुद्ध षडयंत्र रचणाऱ्या अशा किमान 20 जणांना संपवलं.
राजनाथ सिंहांचे प्रत्युत्तर
"काय, आम्ही 20 दहशतवाद्यांना मारले असे तुम्ही म्हणालात? पाकिस्तानातील कोणत्याही दहशतवाद्याने भारताला त्रास देण्याचा किंवा येथे कोणतेही दहशतवादी कृत्य करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही त्याला चोख प्रत्युत्तर देऊ. जर तो पाकिस्तानात पळून गेला तर आपण तिथे जाऊन त्याला मारून टाकू," असा इशारा राजनाथ सिंह यांनी दिला. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आम्ही घरात घुसून मारणार' अशी टिप्पणी केली होती. याकडे राजनाथ सिंह यांनी लक्ष वेधत, 'पंतप्रधानांनी जे सांगितले ते अगदी खरे आहे. ही भारताची ताकद आहे, पाकिस्तानलाही ते कळू लागले आहे, असेही म्हटलं.
"भारताला आपल्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवायचे आहेत. भूतकाळाचा इतिहास पाहिला तर आपण कधीही आक्रमक नव्हतो, दुसऱ्या देशाची एक इंचही जमीन काबीज करण्याचा प्रयत्न कधी केला नाही. हेच भारताचे वैशिष्ट्य आहे. पण जर कोणी भारताला वारंवार आव्हान देत असेल, इथे येऊन दहशतवादी कारवाया करत असेल तर त्याला सोडले जाणार नाही," असेही राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानबाबतच्या त्या अहवालावर भाष्य केलं आहे. अहवालात केलेले आरोप 'खोटे आणि भारतविरोधी प्रचार करणारे असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. इतर देशांतील लक्ष्यित हत्या भारत सरकारच्या धोरणाचा भाग नाहीत. भारताने कधीही कोणत्याही देशावर हल्ला केलेला नाही. नवी दिल्लीला आपल्या सर्व शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवण्याचा मानस आहे, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अनेकवेळा सांगितले आहे.