वायुदलाच्या एअर स्ट्राईकवर लक्ष ठेवून होते पंतप्रधान मोदी

भारतीय वायुदलाच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर जोरदार हल्ला केला.

Updated: Feb 26, 2019, 01:46 PM IST
वायुदलाच्या एअर स्ट्राईकवर लक्ष ठेवून होते पंतप्रधान मोदी title=

नवी दिल्ली : भारतीय वायुदलाच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर जोरदार हल्ला केला. या कारवाईनंतर भारतीय जवानांसह भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देखील कौतुक होत आहे. १४ फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. यानंतर देशात संतापाची लाट होती. या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलं होतं की, या हल्ल्याचा बदला घेतला जाईल. पाकिस्तानला पंतप्रधान मोदींनी कडक शब्दात इशारा दिला होता. मंगळवारी जेव्हा हवाईदलाने ही कारवाई केली तेव्हा पंतप्रधान मोदी हे देखील साउथ ब्लॉकमध्येच उपस्थित होते. कंट्रोल रूममधून पंतप्रधान मोदी या सर्व कारवाईवर लक्ष ठेवून होते. हवाईदलाने पीओकेमधील दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्धवस्त केले. ज्यामध्ये जवळपास २०० ते ३०० दहशदवादी मारले गेल्याची माहिती येत आहे.

भारतीय हवाईदलाने बालाकोटमध्ये 3.45 वाजेच्या दरम्यान, मुजफ्फराबादमध्ये 3.48 च्या दरम्यान तर चाकोटीमध्ये 3.58 च्या दरम्यान दहशतवाद्यांचे कॅम्प उद्धवस्त केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या. त्यांनी म्हटलं की, 'दहशतवाद्यांच्या ठिकाणांना उद्धवस्त करण्यात आलं. पंतप्रधान मोदींनी याआधीच जवानांना पूर्ण सूट दिली होती. मी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देतो. सगळ्या नागरिकांना जे हवं होतं ते घडलं आहे.'

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं की, 'देशाच्या सुरक्षेसाठी हे एक आवश्यक पाऊल आहे. हा महापराक्रम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा हल्ल्यानंतर लष्कराला पूर्ण सूट दिली होती. त्यानंतर ही कारवाई झाली. संपूर्ण देश जवानांच्या पाठिशी उभा आहे.'

भारताने 2016 मध्ये उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पीओकेमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला होता. तेव्हा देखील पंतप्रधान मोदी संपूर्ण रात्र या कारवाईवर लक्ष ठेवून होते. तेव्हा देखील पंतप्रधान मोदींनी जवानांना म्हटलं होतं की, एकही जवान जखमी न होता देशात परतले पाहिजे.

तीन दिवसापूर्वीच राजस्थानच्या टोंकमध्ये एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं की, 'हा बदललेला भारत आहे. यावेळी संपूर्ण हिशोब घेतला जाईल. हे दु:ख आम्ही शांतपणे सहन करणार नाहीत. आम्ही दहशतवाद्यांना चिरडणं देखील जाणतो.'