प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात चर्चेत राहिली पंतप्रधान मोदींची टोपी आणि गमछा

सोशल मीडियावर याची खूप चर्चा होत असून अनेकांना या टोपीबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे.

Updated: Jan 26, 2022, 03:48 PM IST
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात चर्चेत राहिली पंतप्रधान मोदींची टोपी आणि गमछा title=

नवी दिल्ली : देशाच्या ७३व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने (Republic Day) राजधानी दिल्लीत राजपथावर नव्या भारताच्या लष्करी सामर्थ्याची झलक पाहिला मिळाली. देशाच्या हवाई, लष्करी आणि नौदलच्या शक्तीचं प्रदर्शन संपूर्ण जगाने पाहिलं. या सोहळ्यात देशाच्या सांस्कृतिक विविधतेची झलकही दिसली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर  (National War Memorial) जात कार्यक्रमाची सुरुवात केली. सर्वप्रथम, पंतप्रधान मोदी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पोहोचले, जिथे त्यांनी सशस्त्र दलाच्या जवानांना श्रद्धांजली वाहिली.

प्रजासत्ताक दिनाच्या हा शानदार सोहळा सुरु असताना सर्वाचं लक्ष वेधून घेतलं ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टोपी आणि गमछाने. सोशल मीडियावर याची खूप चर्चा होत असून अनेकांना या टोपीबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे.

काय आहे या टोपीचं वैशिष्ट्य
पंतप्रधान मोदी यांनी प्रजासत्ताक दिनी उत्तराखंडची टोपी आणि मणिपूरचा गमछा परिधान केला होता. विविध राज्यांच्या प्रतिकांचा खुबीने वापर करण्यात माहीर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडची टोपी घातली होती. 

या टोपीवर ब्रह्म कमळ आहे, जे उत्तराखंडचे राज्य फूल आहे आणि एक शुभ प्रतीक मानलं जातं. याशिवाय त्यामध्ये चार रंगांची एक पट्टी बनवण्यात आली आहे, जी जीवसृष्टी, निसर्ग, पृथ्वी, आकाश यांचं प्रतिक आहे. ही टोपी उत्तराखंडमधील स्थानिक कारागिरांनी बनवली आहे. 

पीएम मोदी पूजा करण्यासाठी केदारनाथला पोहोचले होते तेव्हा त्यांनी हीच फुलं अर्पण केली होती. पंतप्रधान मोदींनी मणिपूरचा गमछाही घातला होता. या दोन्ही राज्यांमध्ये पुढील महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत.

उत्तराखंडचे सीएम धामी यांनी केलं ट्विट
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी याबाबत ट्विट केलं, 'आज ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान @narendramodi  यांनी ब्रह्मकमलाने सुसज्ज देवभूमी उत्तराखंडची टोपी परिधान करून आपल्या राज्याची संस्कृती आणि परंपरेचा गौरव केला आहे.