...अखेर भारताने २४ औषधांच्या निर्यातीवरील निर्बंध उठवले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हायड्रोक्लोरोक्वीन या औषधाचा पुरवठा न केल्यामुळे भारताला गर्भित इशारा दिला आहे.

Updated: Apr 7, 2020, 11:47 AM IST
...अखेर भारताने २४ औषधांच्या निर्यातीवरील निर्बंध उठवले title=
नवी दिल्ली: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक औषधांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या २४ औषधांच्या निर्यातीवरील निर्बंध अखेर भारताकडून हटवण्यात आले आहेत. मात्र,  कोरोनाच्या उपचारात महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या हायड्रोक्लोरोक्वीन आणि पॅरासिटमॉल या औषधांवरील निर्बंध अजूनही कायम आहेत. देशांतर्गत गरज पूर्ण झाल्यानंतरच या औषधांची निर्यात करण्यात येईल. त्यासाठी औषध कंपन्या आणि परराष्ट्र मंत्रालय देशातील कोरोना प्रादुर्भावाच्या परिस्थितीचा आढावा करून निर्णय घेतील, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. 
 
आज सकाळीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हायड्रोक्लोरोक्वीन या औषधाचा पुरवठा न केल्यामुळे भारताला गर्भित इशारा दिला होता. भारत हा जेनेरिक औषधांची निर्मिती करणाऱ्या प्रमुख देशांपैकी  एक आहे.
मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताने अनेक औषधांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. यामध्ये hydroxychloroquine या गोळीचाही समावेश आहे. भारताने या औषधाची निर्यात बंद केल्याने  आंतरराष्ट्रीय बाजारात या गोळीसह इतर औषधांचा तुटवडा जाणवत आहे.
 
परंतु, भारताने अमेरिकेन कंपन्यांकडून देण्यात आलेली hydroxychloroquine गोळ्यांची ऑर्डर पूर्ण करावी, अशी विनंती ट्रम्प यांनी मोदींकडे केली होती. मात्र, भारतातील सध्याची परिस्थिती पाहता मोदी सरकार hydroxychloroquine चा इतका मोठा साठा अमेरिकेला देण्यास राजी नाही.
 
त्यामुळे आता ट्रम्प यांनी भारताला थेट इशाराच दिला होता. मी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोललो होतो.  hydroxychloroquine औषध पुरवले तर अमेरिका तुमची आभारी राहील, असे मी त्यांना सांगितले. मोदींना ते शक्य झाले नाही तरी ठीक आहे. मात्र, याला जशास तसे उत्तर नक्कीच दिले जाईल. किंबहुना ते का दिले जाऊ नये, असा धमकीवजा प्रश्न डोनाल्ड ट्रम्प यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आगामी काळात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती उद्भवल्यास अमेरिका भारताची अडवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही.