नव्या कायद्याअंतर्गत दाखल झाला पहिला गुन्हा; नव्या नियमांनुसार पोलिसांनी 'अशी' केली FIR

1st FIR in Delhi:   भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा आजपासून देशभरात लागू झालाय. आता या कायद्याअंतर्गत देशातील पहिला गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे.

Pravin Dabholkar | Updated: Jul 1, 2024, 09:20 AM IST
नव्या कायद्याअंतर्गत दाखल झाला पहिला गुन्हा; नव्या नियमांनुसार पोलिसांनी 'अशी' केली FIR title=
New Criminal Law 1st FIR

1st FIR in Delhi: देशभरात आजपासून नवा कायदा लागू झाला आहे. ब्रिटीश काळात बनवलेल्या फौजदारी कायद्यांच्या जागी 3 नवीन कायदे अस्तित्वात आले आहेत. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा आजपासून देशभरात लागू झालाय. आता या कायद्याअंतर्गत देशातील पहिला गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. कुठे नोंद झालाय हा गुन्हा आणि कशाप्रकारे लिहिली गेलीय FIR? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

नव्या कायद्याअंतर्गत देशातील पहिला गुन्हा दिल्लीच्या कमला मार्केट येथील पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलाय. तिथल्या पोलीस सब इन्स्पेक्टरने स्वत: आरोपीविरोधात गुन्हा दाखल केलाय. 

दाखल करण्यात आलेल्या एफआयरनुसार एसआय कार्तिक मीणा यांनी हा गुन्हा दाखल केलाय. सब इन्स्पेक्टर कार्तिक हे नवी दिल्लीच्या रेल्वे स्टेशनजवळील फूटपाथजवळ पेट्रोलिंग करत असताना डीलक्स शौचालयाजवळ पोहोचले. येथे एक इसम सार्वजनिक रस्त्यावर ठाण मांडून बसला आणि विडी, सिगारेट, पाणी,  पोहोचवत होता.  यामुळे येथून येजा करणाऱ्या नागरिकांना त्रास होत होता. 

हे पाहून एसआय कार्तिक यांनी त्या इसमाला हटकले. रस्त्यातून स्टॉल बाजूला करण्यास सांगितले. पण आपण हतबल आहोत. आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीय, असे म्हणून स्टॉल मालक तिथून निघून गेला. यानंतर इन्स्पेक्टर यांनी स्टॉल धारकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 

हेही वाचा: आजपासून भारतीय गुन्हेगारी कायद्यात झाले 10 मोठे बदल, तुम्हाला माहितीयत का?

आता अशी लिहिली जाणार नवी FIR 

आता एफआयआर नव्या पद्धतीने लिहिली जाणार आहे. नवीन कायद्यानुसार ती बीएनएस अंतर्गत लिहावी लागेल. नव्या कायद्यानुसार दाखल झालेल्या पहिल्या एफआयआरची प्रत समोर आलीय. 

भारतीय न्याय संहिताच्या कलमाअंतर्गत रात्री 12 वाजल्यानंतर सर्व प्रकरणातील एफआयआर दंड प्रक्रिया संहिता म्हणजेच सीआरपीसीऐवजी भारतीय नागरी सुरक्षा संहिता म्हणजेच बीएनएसच्या कलम 173 अंतर्गत घेतली जात आहे.

25 हजार पोलिसांना ट्रेनिंग 

नव्या कायद्या अंतर्गत एफआयआर दाखल करणे आणि तपास करण्यासासंबधी 25 हजार दिल्ली पोलीस कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देण्यात आले आहे.

नव्या कायद्यात काय?

IPC मध्ये एकूण 511, BNS मध्ये 358 कलमे आहेत. आयपीसीच्या सर्व तरतुदी भारतीय न्यायिक संहितेत संक्षिप्त केल्या आहेत. आयपीसीच्या तुलनेत BNS मध्ये 21 नवीन गुन्ह्यांची भर पडली आहे. 41 गुन्ह्यांमध्ये तुरुंगवासाची मुदत वाढवण्यात आली आहे. 82 गुन्ह्यांमध्ये दंडाच्या रकमेत वाढ झाली आहे. 25 गुन्हे असे आहेत ज्यात किमान शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सहा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी समाजसेवा करावी लागणार आहे. तर 19 कलमे काढण्यात आली आहेत. नवीन गुन्हेगारी कायद्यांतर्गत, तुम्ही कुठूनही गुन्हा नोंदवू शकता. तुम्ही FIR ऑनलाइन नोंदवू शकता. पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नाही. झिरो एफआयआर सुरू करण्यात आला असून त्याद्वारे कोणीही कोणत्याही पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवू शकतो.