भारतानं पाकिस्तानकडे सोपवले पुलवामा हल्ल्याचे 'डोजियर', तातडीने कारवाईची मागणी

जैश...चं तळ आणि प्रशिक्षण केंद्र पाकिस्तानातच असण्याची माहितीही देण्यात आली 

Updated: Feb 28, 2019, 11:56 AM IST
भारतानं पाकिस्तानकडे सोपवले पुलवामा हल्ल्याचे 'डोजियर', तातडीने कारवाईची मागणी  title=

नवी दिल्ली : जम्मू काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या आत्मघाती हल्ल्याचे पुरावे बुधवारी भारताकडून पाकिस्तानकडे सोपवण्यात आले. या पुराव्यांमध्ये हल्लायासंदर्भातील काही विशेष माहिती असून, जैश-ए-मोहम्मद या दहशतवदी संघनेचा पुलवामा हल्ल्यात हात होता याविषयीचेही पुरावे असल्याचं सांगण्यात येत आहे. याव्यतिरिक्त या डोजियरमध्ये जैश...चं तळ आणि प्रशिक्षण केंद्र पाकिस्तानात असण्याची माहितीही देण्यात आली आहे. 

पाकिस्तानच्या कार्यवाहक उच्चायुक्तांकडे हे डोजियर सोपवण्यात आलं असून, शेजारी राष्ट्राकडून त्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या डोजियरमध्ये पाकिस्तानकडून भारतीय हवाई सीमा ओलांडण्यात आलं असून, भारतीय सैन्यदल चौक्यांवर निशाणा साधला गेल्याची बाबाही नमूद करण्यात आली आहे. हे डोजियर सोपवण्यापूर्वीच एक दिवस आधी भारताकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये जात जैश ए मोहम्मदच्या दहशतवदी तळांचा नायनाट करण्यात आला होता. 

३००हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मंगळवारी पहाटे भारतीय वायुदलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये असणाऱ्या बालाकोट येथे हल्ला केला होता. जैशचं तळ असणाऱ्या या भागात केलेल्या हल्ल्यामध्ये ३००हून अधिक दहशतवादी मारले गेले. ज्यामध्ये जैशमधील काही म्होरके आणि इतर प्रशिक्षकांचा समावेश होता. पुलवामा हल्ल्यचं उत्तर म्हणून या हे प्रतिबंधात्मक पाऊल भारताकडून उचलण्यात आलं होतं. 

पाकव्याप्त भूमीवर दहशतवादी संघटनांना मिळणारा आश्रय आणि त्यांच्या कृत्यांचं होणारं समर्थन याविषयीही भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. 

डोजियरमध्ये नमूद गोष्टी

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जैशचाच हात होता ही बाब डोजियरमध्ये नमूद करण्यात आली आहे. सोबतच पाकिस्तानमध्ये असणाऱ्या दहशतवादी तळांच्या मुद्द्याकडेही या माध्यमातून लक्ष वेधण्यात आलं आहे. येत्या काळात लवकरात लवकर पाकने दहशतवाद्यांना देण्याच येणारं समर्थन थांबवत यावर तातचीने कडक कारवाई करावी अशी मागणीही करण्यात येईल अशी आशा असल्याचं या डोजियरमध्ये मांडण्यात आलं आहे.