नवी दिल्ली : भारतानं मंगळवारी पाकिस्तानच्या एलओसीवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर चवळताळलेल्या पाकिस्ताननं बुधवारी सकाळी भारतावर विमानांच्या सहाय्यानं हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. परंतु, भारतानं दिलेल्या प्रत्यूत्तरासमोर त्यांचा हा प्रयत्न फसला. भारत - पाकिस्तान दरम्यान तणाव इतका वाढला की १९७१ नंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांनी एकमेकांची विमानं पाडली आणि हवाई हद्द ओलांडण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान पाकिस्ताननं एका भारतीय वैमानिकाला अटक केल्याचा दावा केला. या वैमानिकाला भारतात सुखरुप परत आणण्याचे सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. भारत-पाक या शेजारील देशांत तणाव निवळल्यानंतर पाकिस्तानकडून या वैमानिकाला भारताच्या ताब्यात दिलं जाऊ शकतं, अशी शक्यता कूटनीतिज्ञांकडून व्यक्त करण्यात आलीय.
सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय वायुसेनेच्या विंग कमांडरची लवकरात लवकर सुटका सुनिश्चित करण्यासाठी भारत आणि पाकिस्तानच्या परदेश मंत्रालया दरम्यान उच्चस्तरावर चर्चा सुरू आहे.
अद्याप पाकिस्तानकडून याबद्दल कोणतंही अधिकृत वक्तव्य करण्या आलं नसलं, तरी सूत्रांच्या माहितीनुसार, जिनिव्हा करारानुसार पाकिस्ताननं भारतीय वैमानिकाला सहीसलामत भारताकडे सोपवणंच योग्य ठरेल. संयुक्त राष्ट्रसंघाच्या नियमानुसार, युद्धकैद्याला योग्य सन्मानासह त्याच्या राष्ट्राकडे हस्तांतरण करणं पाकिस्तानलाही बंधनकारक आहे.
दरम्यान, बुधवारी भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं जाहीर केलेल्या पत्रकात वैमानिकाचा अमानुष व्हिडिओ दाखवल्याचा कठोर शब्दांत निषेध व्यक्त केला. अशाप्रकारे वैमानिकाला ताब्यात घेऊन पाकिस्तानने जिनिव्हा कराराचे उल्लंघन केला असल्याचेही भारताने म्हटले आहे. तसंच वैमानिकाला कुठलीही इजा होता कामा नये, असंही भारताने पाकिस्तानला खडसावलंय.
गुरुवारी पाकिस्तानातील भारतीय उच्चायोगानंही पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाला भारतीय वैमानिकाला लवकरात लवकर आणि सुखरूप भारताकडे सोपवण्याचा डेमार्श (राजनैतिक पाऊल) दिलाय. तसंच हीच सूचना नवी दिल्लीतील पाकिस्तानच्या उच्च आयुक्तांनीही देण्यात आलीय.