Omicron Variant Update : भारतासह जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनची (Omicron) प्रकरणं वेगाने वाढत आहेत. ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांच्यासाठीही ओमायक्रॉनचा धोका असल्याचं जगभरातील तज्ज्ञांनी म्हटलं आहे. अशा परिस्थितीत बूस्टर डोस (Booster Shot) म्हणजेच लसीच्या तिसऱ्या डोसबाबत देशात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
ओमायक्रॉनबाबत केलेल्या अभ्यासावरुन काही तज्ज्ञांनी दावा केला आहे की, बूस्टर डोस देऊन, लोकांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल आणि कोरोनाच्या या नव्या संकटापासून बचाव केला जाऊ शकेल. मात्र, भारतात बूस्टर डोस किती दिवस उपलब्ध होणार यावर मोठं प्रश्नचिन्ह आहे.
भारताच्या लसीकरण प्रोटोकॉलनुसार (Vaccination in India), सध्या लोकांना ठराविक अंतरानंतर लसीचे दोन डोस देण्याचा नियम आहे. आतापर्यंत, देशातील 138 कोटींहून अधिक लोकांना लसीचा किमान एक डोस देण्यात आला आहे.
मॉर्डनाची लस किती परिणामकारक
लस उत्पादन करणाऱ्या मॉडेर्ना कंपनीने दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे, मॉर्डना लसीचा (Moderna vaccine) बूस्टर डोस वेगाने पसरणाऱ्या ओमायक्रॉन प्रकारापासून संरक्षण देऊ शकतो. प्रयोगशाळेतील चाचण्यांमधून असं निदर्शनास आलं आहे की अर्ध्या डोसच्या बूस्टर शॉटमुळे अँटीबॉडीजची पातळी 37 पटीने वाढू शकते, जी ओमायक्रॉनचा सामना करण्यास सक्षम आहे. त्याचवेळी पूर्ण डोसमुळे अँटीबॉडीजच्या पातळीत 83 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते, असं मॉर्डना कंपनीने सांगितलं आहे.
भारत बायोटेकने तिसऱ्या डोससाठी मागितली परवानगी
भारत बायोटेकने DGCI कडे कोविड-19 लसीच्या तिसऱ्य डोससाठी परवानगी मागितली आहे. भारत बायोटेकने विकसित केलेली इंट्रानेसल लस BBV154 च्या वापरास भारताने अद्याप मान्यता दिलेली नाही. देशातील ज्या लोकांना कोविशील्ड (Covishield) किंवा कोवॅक्सिन (Covaxin) लस देण्यात आली आहे, त्यांना बूस्टर डोस दिला जाऊ शकतो, असं कंपनीचं म्हणणं आहे. सध्या भारतात बूस्टर डोसबाबत सरकारकडून काहीही स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
वैज्ञानिक काय म्हणतायत
भारतासारख्या मोठ्या देशात वृद्ध आणि कमी प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना बूस्टर डोस देऊन कोरोनाच्या धोक्यापासून संरक्षण करणं आवश्यक असल्याचं लंडनच्या इंपिरियल कॉलेजमधल्या शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. बूस्टर शॉट देऊन मृत्यूच्या संख्येत 5 टक्के कपात केली जाऊ शकते. याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.