महाराष्ट्रासह १० राज्यांमध्ये कोरोनाची स्थिती चिंताजनक, आरोग्य मंत्रालयाने केलं सतर्क

देशात कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या ३ लाखाहून अधिक झाली आहे

Updated: Jan 20, 2022, 08:47 PM IST
महाराष्ट्रासह १० राज्यांमध्ये कोरोनाची स्थिती चिंताजनक, आरोग्य मंत्रालयाने केलं सतर्क title=

Corona Cases in India : देशात कोरोना (Corona) महामारीने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गेल्या चोवीस तासात देशात ३ लाखाहून अधिक रुग्ण आढळून आले. गेल्या आठ महिन्यातील ही सर्वोच्च रुग्णसंख्या आहे.  या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण (Rajesh Bhushan) यांनी पत्रकार परिषद घेत चिंता व्यक्त केली आहे. 

महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, गुजरात, ओडिशा, दिल्ली आणि राजस्थान सक्रिय प्रकरणांच्या बाबतीत पहिल्या 10 राज्यांमध्ये आहेत. या राज्यांच्या सतत संपर्कात असून या राज्यांना आवश्यक मार्गदर्शनही केलं जात असल्याचं राजेश भूषण यांनी सांगितलं.

राजेश भूषण म्हणाले की, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये काहीशी चिंता आहे. आम्ही या राज्यांमध्ये केंद्रीय आरोग्य पथके पाठवली आहेत आणि सतत परिस्थितीचा आढावा घेत आहोत. असं असलं तरी कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेतील सक्रिय रुग्णांच्या तुलनेत मृत्यूची संख्या खूपच कमी झाली आहे. दुसर्‍या लाटेत लसीकरण केलेली लोकसंख्या 2 टक्के होती, आता तिसर्‍या लाटेत लसीकरण केलेली लोकसंख्या 72 टक्के इतकी आहे.

सध्या जगात कोरोनाची चौथी लाट
आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं की, सध्या जगात कोविडची चौथी लाट (corona fourth wave) दिसून येत आहे. गेल्या 1 आठवड्यात दररोज 29 लाख केसेसची नोंद झाली. गेल्या 4 आठवड्यांत आफ्रिकेत कोविडची प्रकरणे कमी होत आहेत. युरोपमध्येही केसेस कमी होत आहेत. पण आशियामध्ये कोविडची प्रकरणे वाढली आहेत. 

भारतात सध्या सुमारे 19 लाख सक्रिय रुग्ण आहेत, गेल्या एका आठवड्यापासून सुमारे 2,71,000 प्रकरणे दररोज नोंदवली जात आहेत. सकारात्मकता दर 16 टक्के आहे. गेल्या 24 तासांत 3,17,000 रुग्णांची नोंद झाली आहे. राजेश भूषण पुढे म्हणाले की, केरळमध्ये सकारात्मकतेचे प्रमाण ३२ टक्के आहे. दिल्लीत सकारात्मकता दर 30 टक्के आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये तो 6 टक्क्यांहून थोडा जास्त आहे. देशात 11 राज्ये आहेत जिथे 50 हजारांहून अधिक सक्रिय प्रकरणे आहेत, तर 13 राज्यांमध्ये 10-50 हजार सक्रिय रुग्ण आहेत.

गेल्या ४ दिवसांत रोजच्या कोविड चाचणीत सातत्याने वाढ करण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत सुमारे 19 लाख चाचण्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील साप्ताहिक सकारात्मकता दर 2 टक्क्यांवरून 22 टक्क्यांवर पोहोचला आहे. कर्नाटकातील सकारात्मकता दर 4 आठवड्यांपूर्वी 0.5 टक्के होती जो आता 15 टक्के झाला आहे.