India China face-off: दिल्लीतील हालचालींना वेग; राजनाथ सिंह, अमित शहा पंतप्रधानांच्या भेटीला

परिस्थिती अधिकच टोकाला 

Updated: Jun 16, 2020, 11:11 PM IST
India China face-off: दिल्लीतील हालचालींना वेग; राजनाथ सिंह, अमित शहा पंतप्रधानांच्या भेटीला title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : भारत आणि चीनमध्ये सुरु असणाऱ्या तणावाच्या परिस्थितीत आणखी एक वळण आलं आहे. ज्यामध्ये वृत्तस्थेनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तामुसार भारताचे २० जवान शहीद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर, चीनच्या सैन्यालाही या प्रकरणी जिवीत हानी झाली आहे. या सर्व घटनांची साखळी पाहता काहीवेळापूर्वीच केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान मोदींची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. 

पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीमध्ये तिन्ही नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचं म्हटलं गेलं. या बैठकीनंतर राजनाथ सिंह यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचीही भेट घेतली. शिवाय सिंह यांनी सैन्यदल प्रमुख जनरल बिपीन रावत आणि लष्कर प्रमुख एम.एम. नरवणे यांच्यासोबतही बैठक घेतली. 

 

भारतीय सैन्यानं पुन्हा एलएसी ओलांडली, चीनचा कांगावा  

देशाच्या सीमेवर सुरु असणारं हे वातावरण पाहता सुरक्षेच्या दृष्टीनं दिवसभरात दोन उच्चस्तरीय बैठका घेण्यात आल्या. ज्यामध्ये चीनच्या सैन्यासोबत झालेली झडप, शहीद जवानांचा आकडा आणि त्या दृष्टीने घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. 

दौरे रद्द ... 
भारत- चीनमधील परिस्थिती अधिक चिघळताना दिसत असल्यामुळं लष्करप्रमुखांचा पठाणकोट दौराही रद्द करण्यात आला. तर, सैन्यदल प्रमुख बिपीन रावत यांनीसुद्धा परराष्ट्र मंत्र्यांची तातडीनं भेट घेतली. 

दरम्यान, लडाखमधील गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री भारतीय आणि चिनी सैनिक एकमेकांना भिडले. यावेळी झालेल्या तुंबळ हाणामारीत भारतीय सैन्यदलातील एक कमांडिंग ऑफिसर आणि दोन सैनिक शहीद झाल्याची माहिती समोर आली. या प्राथमिक माहितीनंतर देशातील राजकीय आणि निर्णायक सूत्रांच्या हालचाली वाढल्या. याच परिस्थिती काही तासांनी २० भारतीय जवान शचहीद झाल्याचं गंभीर वृत्त समोर आलं.