सतिश मोहिते, झी 24 तास, नांदेड: दरवर्षी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपण स्वातंत्र्यदिन साजरा करतो. यंदा आपण 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत. यादिवशी पंतप्रधान लाल किल्ल्यावर देशाला संबोधित करतात. देशभरातील शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालये, सोसायटीमध्ये ध्वजारोहण केले जाते. महाराष्ट्रातही स्वातंत्र्य दिनाची लगबग सुरु झाली आहे. राज्यात केवळ दोनच ठिकाणी खादीचे तिरंगा ध्वज तयार केले जातात. वर्षभर येथे ध्वज निर्मिती केली जाते. याबद्दल जाणून घेऊया.
पूर्वी तिरंगा ध्वज वापराचे काही नियम होते. शाळा, महाविद्यालये, शासकीय निमशासकीय कार्यालये यांवर केवळ खादीचा झेंडा लावावा असा नियम होता. हर घर तिरंगा या उपक्रमामुळे तिरंगा ध्वज वापराचे नियम थोडे शिथिल करण्यात आले. आता खादी सोडून इतर कपड्यांपासूनही तिरंगा ध्वज निर्मिती केली जात आहे. पण यामुळे मात्र खादी कपड्याच्या तिरंगा ध्वजाची मागणी कमी झाली आहे.
नांदेडमध्ये तयार करण्यात आलेला तिरंगा ध्वज एकवेळ दिल्लीच्या लाल कील्यावरही फडकला होता. शिवाय मंत्रालयावर ही तिरंगा फडकलाय. खादी ग्रामोद्योग मध्ये तयार केले जाणारे ध्वज निकषानुसार तयार केले जातात. नागरिकांनी इतर कोणताही ध्वज वापरताना तिरंग्याचा अपमान होणार नाही एव्हढी काळजी घ्यावी एव्हढेच आवाहन.
भारताच्या प्रत्येक नागरिकाचा अभिमान असलेल्या तिरंगा ध्वजाची निर्मिती भारतात चार ठिकाणी केली जाते. कर्नाटक मधील हुबळी, राजस्थान मधील ग्वालियर आणि आपल्या राज्यात मुंबई आणि नांदेडमध्ये तिरंगा ध्वज निर्मिती केली जाते. नांदेडच्या मराठवाडा खादी ग्रामोद्योग कार्यालयात वर्षभर खादी कपड्यापासून तिरंगा ध्वज निर्मिती केली जाते. नांदेडमध्ये तयार केला जाणारा तिरंगा ध्वज देशातील सोळा राज्यात पाठवला जातो. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांवर खादीचा हा झेंडा फडकावला जातो.