नवी दिल्ली : आयकर विभागाने आज देशातील प्रमुख बिटकॉइन एक्सचेंजमध्ये छापेमारी केली आहे. अधिकारीक सूत्रांनी सांगितले की, कथित रूपात कर चोरीच्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
आयकर विभागाच्या बेंगळुरू चौकशी टीमच्या नेतृत्वात विभागाच्या वेगवेगळ्या टीमने दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद, कोच्चि आणि गुरूग्रामसहीत नऊ एक्सचेंज परिसरांमध्ये छापे मारले. ही कारवाई इन्कम टॅक्स लॉच्या सेक्शन १३३ए नुसार करण्यात आली. या कारवाईचा उद्देश गुंतवणूकदार आणि व्यापा-यांची ओळख मिळवणे, त्यांच्याकडून करण्यात आलेले सौदे, दुस-या पक्षांची ओळख, वापरण्यात आलेली बॅंक खाती इत्यादीची माहिती घेणे हा होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छापेमारी करणा-या टीमकडे एक्सचेंजबद्दल वेगवेगळ्या प्रकारची वित्तीय आकडेवारी होती. देशात त्यांच्या विरुद्ध ही पहिलीच मोठी कारवाई आहे. बिटकॉइन एक आभासी मुद्रा आहे. देशात ही मुद्रा अधिकृत नाहीये. या कॉइनच्या वाढत्या वापरामुळे जगभरातील बॅंका चिंतेत पडल्या आहेत.
भारतीय रिझर्व्ह बॅंकेने ही करन्सी वापरणा-या लोकांना इशारा दिला आहे. यावर्षी मार्चमध्ये केंद्रीय अर्थ मंत्रायालयाने देश आणि जागतिक स्तरावर या करन्सीवर एक अंतर अनुशासनात्मक समितीची स्थापना केली होती.