महिलांवर अत्याचार करणाऱ्या, मुलीच्या जन्मावर दु:खी होणाऱ्यांना मंदिरात प्रवेशबंदी

बलात्कार करणार्‍यांसाठी देवीच्या मंदिरांचे दरवाजे बंद...

Updated: Dec 12, 2019, 12:12 PM IST
महिलांवर अत्याचार करणाऱ्या, मुलीच्या जन्मावर दु:खी होणाऱ्यांना मंदिरात प्रवेशबंदी  title=
संग्रहित फोटो

उत्तर प्रदेश : काशीमध्ये बलात्कार करणार्‍यांसाठी देवीच्या मंदिरांचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. सामाजिक संस्था आगमन यांनी या मोहीमची सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत आज वाराणसीच्या कालिका गली येथील कालरात्री मंदिरात अत्याचार करणार्‍यांच्या तसेच मुलींचा अनादर करणाऱ्या आणि मुलींच्या जन्माबद्दल दु:खी होणाऱ्यांना मंदिरात प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे.

यासाठी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारात तसंच गाभाऱ्यासहीत अन्य ठिकाणीही याबाबत पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या पोस्टर्समध्ये जे मुलींचा सन्मान करत नाहीत, जे मुलींच्या जन्मावर नाखूष आहेत आणि मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

पोस्टरवर, २ दशकांपासून मुलींच्या जन्म, सुरक्षा आणि हक्कांसाठी संघर्ष करत असलेल्या मॅजिक सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संतोष ओझा यांनी सांगितलं की, संस्थेने दुष्कर्म आणि मुलींच्या जन्माबद्दल दु:ख व्यक्त करणाऱ्यांसाठी कालरात्री मंदिरात पोस्टर लावले आहेत. अशा लोकांसाठी मंदिरात प्रवेश बंदी घालण्यासाठी या मोहीमेची सुरुवात केली आहे.

शहरातील इतर देवींच्या मंदिरांमध्येही अशा प्रकारची पोस्टर्स लावून बनारसमधील सर्व मंदिरांमध्ये, अशा लोकांच्या मंदिर प्रवेशावर बंदी घालण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येणार आहे. 

उत्तर प्रदेशमध्ये जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांमध्ये बलात्काराच्या तब्बल ८६ घटनांची नोंद झाली आणि लैंगिक अत्याचाराची १८५ प्रकरणं घडली आहेत. गेल्या वर्षभरात तब्बल ८६ बलात्कार नोंदवले गेलेत. ज्या तरुणी तक्रारीसाठी पुढे आलेल्या नाहीत, अशी कितीतरी प्रकरणं असण्याची शक्यता आहे. उत्तरप्रदेशसह संपूर्ण देशात बलात्करांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं चित्र आहे. या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त केली जात आहे.