सलग पाचव्या दिवशी काश्मीरशी हवाई संपर्क तुटला

तापमानात विक्रमी घट.... 

Updated: Dec 12, 2019, 11:51 AM IST
सलग पाचव्या दिवशी काश्मीरशी हवाई संपर्क तुटला title=
संग्रहित छायाचित्र

श्रीनगर : कडाक्याची थंडी आणि धुकं यांमुळे काश्मीरच्या बहुतांश परिसरात मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी झाली आहे. परिणामी बुधवारपर्यंत सलग पाचव्या दिवशीही या भागाचा हवाई संपर्क तुटलेला होता. हवामानात होणारे बदल पाहता श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन बऱीच उड्डाणं रद्द करण्यात आली. धुक्याचं प्रमाण बुधवारी तुलनेने कमी झाल्याचं पाहायला मिळालं. पण, कडाक्याची थंडी मात्र स्थानिकांपुढे आव्हानं उभी करत असल्याचं चित्र आहे. 

काश्मीरच्या खोऱ्यात संपूर्ण दिवसभरात झालेली जोरदार बर्फवृष्टी पाहता फक्त हवाई वाहतूकच नव्हे, तर रस्ते वाहतुकीवरही याचे थेट परिणाम झाले. हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सोनमर्ग, बहलगाम, गुलमर्ग यांच्यासोबतच काही पर्वतीय भागांमध्ये होणारी ही बर्फवृष्टी अशीच सुरु राहण्याचे संकेत आहेत. 

विराट कोहलीच्या आलिशान हॉटेलमध्ये मिळतात अफलातून पदार्थ

उणे एकपेक्षाही खाली गेला तापमानाचा पारा.... 

श्रीनगरच्या तापमानाचं सांगायचं झाल्यास जास्तीत जास्त तापमान हे ३.२ अंश सेल्शिअस इतकं नोंदवण्यात आलं. जे सर्वसामान्य तापमानापेक्षा ७ अंशांनी कमी होतं. तर कमीत कमी तापमान १.४ अंश सेल्शिअस इतकं नोंदवण्यात आलं. गुलमर्ग आणि पहलगाम येथे किमान तापमानाने अनुक्रमे उणे ३.६ आणि २.३ अंश सेल्शिअस इतकं नोंदवण्यात आलं. याव्यतिरिक्त लडाखच्या द्रास आणि लेह येथे तापमान उणे १५.३ ते उणे ११.५ अंश सेल्शियस इतकं खाली उतरलं होतं. 

हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार १३ डिसेंबरपर्यंत या परिसरातील हवामान आणखी बिघडू शकतं. शिवाय मध्यम ते जोरदार बर्फवृष्टीही होऊ शकते. याच धर्तीवर स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काश्मीरमध्ये हवामानाचं हे एकंदर चित्र पाहता खासगी आणि सरकारी शाळांना हिवाळ्याची सुट्टी ठरलेल्या तारखेपूर्वीच जाहीर करण्यात आली आहे.