5 कोटी कॅश, हत्यारं, 5 किलो सोन्याची बिस्कीटं अन्...; काँग्रेस आमदाराच्या घरी ED चा छापा

ED Raids Congress MLA: गुरुवारी सकाळी टाकलेल्या छाप्यामधील कारवाई 24 तासांनंतरही सुरुच असून एकाच वेळी अनेक ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे. छापेमारीदरम्यान आमदार घरातच आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 5, 2024, 11:22 AM IST
5 कोटी कॅश, हत्यारं, 5 किलो सोन्याची बिस्कीटं अन्...; काँग्रेस आमदाराच्या घरी ED चा छापा title=
एकाच वेळी 20 ठिकाणी छापेमारी करण्यात आली

ED Raids Congress MLA: सक्तवसुली संचलनानलयाने गुरुवारी सकाळी बेकायदेशीर खाण उत्खनन प्रकरणामध्ये हरियाणाचे काँग्रेसचे आमदार सुरेंद्र पंवार यांच्यासहीत इंडियन नॅशनल लोकदलाचे माजी आमदार दिलबाग सिंह यांच्याशी संबंधित 20 ठिकाणांवर छापेमारी केली. दिलबाग सिंह हे इंडियन नॅशनल लोकदलचे नेते अभय सिंह चौटाला यांचे व्याही सुद्धा आहेत. 4 वर्षांपूर्वी दिलबाग सिंह यांची मुलीचं लग्न अभय सिंह चौटाला यांचा मुलगा अर्जुन चौटालाबरोबर झालं होतं.

अनेक ठिकाणी एकाचवेळी छापे

ईडीच्या वेगवेगळ्या टीम्सने पीएमएलए कायद्याअंतर्गत गुरुवारी सकाळी एकाच वेळी सोनीपतमध्ये काँग्रेस आमदार सुरेंद्र पंवार यांच्या सेक्टर 15 मधील घराबरोबरच त्यांचे सहकारी सुरेश यांच्या घरी, भाजपाचे नेते तसेच कर्नालचे माजी उपमहापौर मनोज वधवा यांच्या सेक्टर-13 मधील घरावर छापे मारले. त्याचप्रमाणे याचवेळी युमानानगरमधील इंडियन नॅशनल लोकदलाचे माजी आमदार दिलबाग सिंह यांच्या घरावर, ऑफिसवर आणि फार्म हाऊसवर त्यावेळी छापेमारी करण्यात आली. 

घरात काय काय सापडलं?

ईडीच्या सुत्रांनी शुक्रवारी सकाळी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस आणदार सुरेंद्र पंवार, इंडियन नॅशनल लोकदलाचे माजी आमदार दिलबाग सिंह आणि त्यांचे सहकाऱ्यांच्या मालकीच्या ठिकाणांवर बेकायदेशीररित्या ठेवलेली हत्यारं, 300 काडतुसं, 100 हून अधिक दारुच्या बाटल्या, 5 कोटी रुपये कॅश, 4 ते 5 किलो सोन्याची बिस्कीटं जप्त करण्यात आली आहेत. तसेच परदेशातील संपत्तीसंदर्भातील माहितीही ईडीला मिळाली आहे. सुरेंद्र पंवार यांच्या घरावर मागील 24 तासांहून अधिक काळापासून छापेमारी सुरु आहे. 

कोर्टाच्या आदेशानंतर कारवाई

बेकायदेशीर खाण उत्खनन प्रकरणामध्ये काँग्रेस आमदाराचं नाव समोर आलं होतं. गुरुवारी सकाळी 8 वाजता वेगवेगळ्या 5 गाड्यांमध्ये ईडीचे अधिकारी आणि सीआयएसएफचे जवान सुरेंद्र पंवार यांच्या घरी छापा मारण्यासाठी पोहोचले. कोर्टाच्या आदेशानंतर ईडीने या प्रकरणामध्ये एक एफआयआर दाखल करुन कारवाई केली. बेकायदेशीर खाण उत्खनन प्रकरणाशीसंबंधित कागदपत्रं, बँक खात्यांची माहिती आणि जमीनी व्यवहारांशी संबंधित कागदपत्रंही ईडीला सापडली आहे.

अनेकदा झाला पराभव

छापेमारीदरम्यान काँग्रेसचे आमदार घरीच होते. ईडीला महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. भाजपाचे नेते मनोज वधवा यांनी 2014 मध्ये इंडियन नॅशनल लोकदलाचेच्या तिकीटवार मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याविरोधात निवडणूक लढली होती. 2019 मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. दोन्ही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर ते भाजपामध्ये शामील झाले. सोनीपतचे काँग्रेस खासदार सुरेंद्र पंवार हे खान उत्खननासंदर्भातील उद्योगाशी संबंधित आहेत. हरियाणाबरोबरच राजस्थानमध्येही पंवार यांची कंपनी काम पाहते.