Pension Scheme: तुमच्या नावावर घर असेल तर वृद्धापकाळात मिळणार पेन्शन! फक्त करा हे काम

ही योजना 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध आहे.

Updated: Aug 24, 2022, 03:32 PM IST
Pension Scheme: तुमच्या नावावर घर असेल तर वृद्धापकाळात मिळणार पेन्शन! फक्त करा हे काम  title=

Bank Pension Scheme: तरुण वयात प्रत्येक जण भविष्याची चिंता करून काम करत असतो. वृद्धापकाळात कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये, यासाठी तजवीज केली जाते. कारण निवृत्तीनंतर पगार थांबतो आणि खासगी नोकरी करणाऱ्यांना पेन्शनही मिळत नाही. आजकाल सरकारी नोकऱ्यांमध्येही कॉन्ट्रॅक्टचा ट्रेंड वाढला आहे. अशा परिस्थितीत सेवानिवृत्तीनंतरआयुष्य कसे जगायचे? असा प्रश्न पडतो. घरखर्च कसा भागवायचा? याची चिंता चाळीशीनंतर लागून राहते. ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा महत्वपूर्ण घटक असल्याने त्यांचे राहणीमान सुसह्य व्हावे, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. आता या समस्येवर मात मिळवण्यासाठी बँकांनी एक नवीन योजना आणली आहे. ही योजना 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध आहे. या अंतर्गत तुम्हाला चांगलं पेन्शन मिळू शकते. चला तर या योजनेबद्दल जाणून घेऊयात.

या योजनेचे नाव रिसर्व मॉर्गेज लोन स्कीम आहे. या योजनेत घर बँकेकडे गहाण ठेवावे लागते. पण बँक तुमच्या घराचा ताबा घेत नाही. घर तुमच्याकडेच राहील. यानंतर, वृद्ध जोडप्यांना आधार देण्यासाठी बँक दरमहा एक निश्चित रक्कम देत राहील. ही योजना गृहकर्जाच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. गृहकर्जामध्ये तुम्हाला दरमहा पैसे जमा करावे लागतात, तर या योजनेत बँक तुम्हाला दरमहा पैसे मिळतात. ही योजना 15 वर्षांसाठी उपलब्ध आहे. 

गहाण ठेवलेल्या घराची किंमत काय आहे यावर रक्कम अवलंबून आहे. जर घराची किंमत 25 लाख रुपये असेल, तर बँक 15 वर्षांपर्यंत दरमहा सुमारे 5000 रुपये देऊ शकते. जर तुम्हाला एकरकमी रक्कम हवी असेल तर ती वैद्यकीय उपचारांसाठी घेतली जाऊ शकते. विशेष बाब म्हणजे या योजनेसाठी किमान उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही.

कर्ज कोण फेडणार?

वृद्ध जोडप्याचा मृत्यू झाल्यावर बँक त्यांच्या मुलांना किंवा कायदेशीर वारसांना हे कर्ज फेडण्याचा पर्याय देते. जर त्यांनी कर्ज जमा केले, तर गहाण ठेवलेली मालमत्ता त्यांना परत केली जाईल, परंतु कायदेशीर वारसांनी पैसे जमा केले नाहीत, तर बँक या घराचा लिलाव करते आणि वृद्धांना दिलेली रक्कम वजा करून उर्वरित रक्कम त्यांच्या वारसांना दिली जाते.