टीम इंडियाच्या पराभवावर रड रड रडला आणि श्वासच अडकला, लहानगा रुग्णालयात दाखल

19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअवर एकदिवसीय विश्वचषकातील अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 6 विकेटने मात केली आणि तिसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरण्याचं भारताचं स्वप्न अपूर्णच राहिलं. या पराभवामुळे करोडो भारतीय क्रिकेटचाहत्यांची निराशा झाली.

राजीव कासले | Updated: Nov 23, 2023, 06:42 PM IST
टीम इंडियाच्या पराभवावर रड रड रडला आणि श्वासच अडकला, लहानगा रुग्णालयात दाखल title=

ICC World Cup 2023 Final : गेले दीड महिना भारतात आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचा जल्लोष होता. लहानमुलांपासून-वृद्धांपर्यंत, गल्लो-गल्ली, ट्रेन असो की बस प्रत्येक ठिकाणी केवळ विश्वचषकाच्या (ODI World Cup) चर्चा रंगल्या होत्या. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) सलग दहा सामने जिंकत फायनलमध्ये धडक मारली. टीम इंडियाचा फॉर्म बघता संपूर्ण देशाने जल्लोषाची तयारी सुरु केली. पण अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा विकेटने  (Australia beat India) पराभव केला आणि करोडो क्रिकेटचाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरलं. भारतात क्रिकेट हा एक धर्म आहे. साहजिकच भारताच्या पराभवानंतर क्रिकेट चाहत्यांच्या डोळ्यात अश्रु तरळे.

लहानगा रड रड रडला
गुरुग्राममध्ये एक लहान मुलगा इतका रडला की त्याला थेट रुग्णालयात दाखल करण्यात आलं. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या पराभवानंतर या लहान मुलाला इतकं दु:ख झालं की त्याने जोरजोरात रडायला सुरुवात केली. तो इतका रडला की त्यामुळे त्याचा श्वास अडकला. मुलाची स्थिती पाहून कुटुंब घाबरलं, त्याने मुलाला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी तात्काळ उपचार सुरु करत मुलाचा जीव वाचवला. तीन दिवसांनी या मुलाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. 

या लहान मुलाचं नाव जेन खान आहे. तो तिसऱ्या इयत्तेत शिकतो. जेन हा विराट कोहलीचा प्रचंड फॅन आहे. त्याने वर्ल्ड कपमध्ये भारताचे सर्व सामने न चुकता पाहिले. वडिल वसीम अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला क्रिकेटचं इतकं वेड आहे की भारताचे सामने सुरु झाल्यावर तो जागचा हलत नाही. इतकंच काय तहान-भूखही हरपून जातो. टीम इंडियाच्या सलग दहा विजयाने जेन प्रचंड खूश होता. टीम इंडिया फायनल जिंकणार याची त्याला खात्री होती. यासाठी त्याने फटाकेही आणून ठेवलं होते. भारताच्या विजयानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्याचं त्याने ठरवलं होतं. 

पण जसजसा सामना भारताच्या हातून निसटायला लागला, तसा जेन निराश होऊ लागला आणि पराभवानंतर त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. आई-वडिलांना त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. पण जेनचं रडणं थांबण्याचं नाव घेत नव्हतं. सामना संपल्यानंतरही अनेक तास तो रडतच होता. रडताना अचानक त्याचा श्वास अडकला आणि त्याला अस्वस्थ वाटू लागलं. मुलाची अवस्था पाहून वडिलांनी त्याला तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं. आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.