भोपाळ: लैंगिक शोषणाचा आरोप असलेले केंद्रीय राज्यमंत्री एम.जे. अकबर यांचा बचाव करताना भाजपच्या महिला नेत्या लता केळकर यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. लता केळकर या मध्य प्रदेश भाजपच्या प्रदेशाध्यक्ष आहेत. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी गुरुवारी लता केळकर यांना एम.जे. अकबर यांच्यावरील आरोपांविषयी प्रतिक्रिया विचारली.
यावेळी लता केळकर यांनी म्हटले की, मी #MeToo मोहीमेचे स्वागत करते. या मोहीमेमुळे महिलांना त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी बळ मिळाले आहे. कदाचित काही वर्षांपूर्वीची एखादी घटना आज महिलांना अन्यायकारक वाटत असेल. परंतु, महिला पत्रकार गैरफायदा उठवता येईल, इतक्या निष्पाप असतात, असे मला वाटत नाही. तरीही सध्या महिलांनी आपले मत मांडणे, एवढीच आमची प्राथमिकता असल्याचे केळकर यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका महिला पत्रकाराने खुलासा करत मुंबईतील एका हॉटेलमध्ये अकबर यांच्याशी झालेल्या भेटीबाबतचा अनुभव सांगितला आहे. अकबर हे हॉटेलच्या रुममध्ये मुलाखती घ्यायचे आणि दारु पिण्यासाठीही ऑफर करायचे. फोनवर बोलताना घाणेरड्या भाषेचा वापर, अश्लिल मॅसेज पाठवणे आणि असभ्य कमेंट करणे असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत.
#WATCH: I welcome this #MeToo campaign but I don't consider women journalists to be so innocent that anyone can misuse them, says Lata Kelkar, Chief of Madhya Pradesh BJP women wing on MJ Akbar. (11.10.18) pic.twitter.com/4gM5shTkg3
— ANI (@ANI) October 12, 2018