रायपूर : सुट्ट्या मिळवण्यासाठी लोक काय काय करतात, हे काही आता लपून राहिलेलं नाही. नुकतंच, छत्तीसगडमध्ये एका रेल्वे कर्मचाऱ्यानंही सुट्टीसाठी एक भन्नाट कारण दिलंय.
छत्तीसगडच्या पंकज राज गोंड या व्यक्तीनं सुट्टीसाठी अर्ज केलाय. रेल्वे कर्मचारी असलेल्या पंकजला सात दिवसांची सुट्टी हवी होती. तो दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या दीपका रेल्वे सायडिंगमध्ये तैनात आहे. यासाठी नियमाप्रमाणे त्यानं अर्जही दाखल केलाय.
स्टेशन मास्टरना लिहिलेल्या अर्जात त्यानं आपल्याला 'चिकन खाण्यासाठी सात दिवसांची सुट्टी' हवी असल्याचं म्हटलंय. पंकजचा हा अर्ज सोशल मीडियात वायरल झालाय.
'पुढच्या महिन्यापासून श्रावण महिना सुरू होतोय. त्यामुळे माझ्या घरी श्रावणात चिकन बनत नाही... त्यामुळे मलाही चिकन खायला मिळणार नाही. यामुळे माझ्या शरीर कमजोर होईल. त्यामुळे मी दीपका सायडिंगमध्ये २४ तास काम करू शकणार नाही. त्यामुळे माझी विनंती आहे की मला चिकन खाण्यासाठी २० जून २०१७ ते २७ जून २०१७ पर्यंत सुट्टी देण्यात यावी' असं पंकजनं आपल्या अर्जात म्हटलंय.
हा अर्ज वायरल झाल्यानंतर पंकजनं हा अर्ज मज्जा म्हणून लिहिल्याचं म्हटलंय. यासाठी त्यानं स्टेशन मास्टरची माफीदेखील मागितलीय.