मायावती आणि अखिलेश निवडणुकीनंतर मोदींशी हातमिळवणी करणार नाहीत- राहुल गांधी

उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव हे आमचे प्रथम उद्दिष्ट आहे.

Updated: May 17, 2019, 09:33 PM IST
मायावती आणि अखिलेश निवडणुकीनंतर मोदींशी हातमिळवणी करणार नाहीत- राहुल गांधी title=

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीनंतर अखिलेश यादव, मायावती, चंद्राबाबू नायडू आणि ममता बॅनर्जी हे नेते नरेंद्र मोदी यांच्याशी हातमिळवणी करतील, असे वाटत नसल्याचे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले. ते शुक्रवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी त्यांनी म्हटले की, उत्तर प्रदेशात सपा आणि बसपाने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. त्याचा मी पूर्णपणे आदर करतो. मात्र, काँग्रेसच्या दृष्टीकोनातून याठिकाणी पक्षाची विचारसरणी रुजवणे, माझे कर्तव्य आहे. मी ज्योतिरादित्य शिंदे आणि प्रियंका गांधी यांना स्पष्टपणे सांगितले आहे की, उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव हे आपले प्रथम उद्दिष्ट आहे. दुसरा उद्देश म्हणजे राज्यात काँग्रेसच्या विचारसरणीचा प्रचार करणे आणि म्हणजे विधानसभा निवडणुकीत विजय मिळवणे, हे आमचे तिसरे उद्दिष्ट असल्याचे राहुल यांनी सांगितले.

दरम्यान, आज देशभरातील राजकीय वर्तुळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांमध्ये घेतलेली पहिलीवहिली पत्रकार परिषद चर्चेचा विषय ठरली. मात्र, या पत्रकार परिषदेतील संवाद हा एकतर्फीच राहिला. अमित शहा आणि नरेंद्र मोदी या दोघांनी पक्षाची भूमिका सविस्तरपणे मांडली. मात्र, पत्रकारांच्या सर्व प्रश्नांना भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनीच उत्तरे दिली. पत्रकारांनी मोदींना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मोदींनी शहांना पुढे करत बोलणे टाळले. मी भाजपचा शिस्तप्रिय कार्यकर्ता आहे. अमित शहा हे पक्षाचे अध्यक्ष आहेत. या नात्याने तेच सर्व प्रश्नांची उत्तर देतील, असे मोदींनी सांगितले.