हीच खरी सावित्री.... पतीचं पार्थिव पाहून तिनेही सोडले प्राण

अमर प्रेमाची प्रचिती देणारा हा प्रसंग पाहून ' तुम्हे दिल दिया है तुम्हे जान भी देंगे..' याच ओळी अनेकांना आठवल्या आणि डोळे नकळत पाणावले.

Updated: Jan 6, 2022, 03:29 PM IST
हीच खरी सावित्री....  पतीचं पार्थिव पाहून तिनेही सोडले प्राण  title=

राजस्थान : तुम्हे दिल दिया है तुम्हे जान भी देंगे या गाण्याच्या ओळी प्रत्यक्षात घडल्यानंतर ग्रामस्थांच्याही डोळ्यात पाणी आलं. आतापर्यंत पतीचं पार्थिव पाहून पत्नीने प्राण सोडल्याचं एखाद्या फिल्ममध्ये पाहिलं असेल. पण हेच नागौरमध्ये प्रत्यक्षात गावकऱ्यांनी अनुभवलं आहे. ही अबोल प्रेमाची कहाणी पाहून त्यांचेही डोळे नकळत पाणावले. 

लग्नाच्या विधीमध्ये सप्तपदीनंतर सात जन्म हाच नवरा मिळावा आणि एकमेकांची साथ देण्याचं वचन घेतलं जातं. एकसाथ जगण्या-मरण्याचं वचन घेतलं जातं. हेच वचन एका पती-पत्नीनं शेवटच्या श्वासापर्यंत पूर्ण केलं आहे. याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. 

राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील रुना गावात 58 वर्षांचे वैवाहिक जीवन जगल्यानंतर एका जोडप्याने अखेरचा श्वास घेतला. या जोडप्याने एकत्र जगाचा निरोप घेतला. दोघांचाही एकत्र मृत्यू झाल्यानंतर दोघांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन्ही मुलींनी अंत्यसंस्काराचे सर्व विधी पार पाडले.

रुना गावात राहणारे ७८ वर्षीय राणाराम सेन यांना श्वसनाचा आजार होता. त्यांना प्रथम नागौर आणि नंतर जोधपूरला उपचारासाठी पाठवण्यात आले. रविवारी सकाळी जोधपूरमध्ये त्यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांचं पार्थिक घरी आणण्यात आलं. आपल्या पतीचं पार्थिव पाहून पत्नीला मोठा धक्का बसला. पार्थिव पाहताच तिनेही आपले प्राण सोडले. 

या दोघांनीही एकत्र जगाचा निरोप घेतल्यानंतर आता यांची गावात चर्चा सुरू आहे. अशी जोडी लाखात एक असते अशी गावात चर्चा आहे. पती-पत्नी दोघांमध्ये अपार प्रेम होते आणि 58 वर्षे एकमेकांना साथ देत राहिले शेवटच्या क्षणापर्यंत.

दोघींच्या मृत्यूनंतर त्यांच्या विवाहित मुलींनी आई-वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला. बँडसह शेवटची अंत्ययात्रा काढण्यात आली. या जोडप्याची चर्चा सर्वत्र आहे.