गुजरातच्या विधानसभा निवडणुकीचे (gujarat election) बिगुल वाजलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. सत्ताधारी भाजपवर आपने जोरदार टीका केली आहे. आपने (AAP) गुजरातमध्ये सरकार स्थापन करण्याचा दावा केलाय. तर भाजपवर (BJP) उमेदवारांवरुन टीका करण्यात येत आहे. मोरबीतील झुलत्या पुलाच्या दुर्घटनेनंतर गुजरातमधील राजकीय वातावरण आणखी तापलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे विधानसभा निवडणुकीसाठी गुजरातमध्ये तळ ठोकून आहेत. यावेळी एका माध्यम समुहाच्या कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांनी याबाबत भाष्य केले. 8 तारखेला मतदारच त्यांचे काय करायचे ते करतील, असे अमित शाह म्हणाले.
"भाजपने कधीही हल्ला केलेला नाही. आम्ही सकारात्मक गोष्टींवर बोलतो. पण सार्वजनिक जीवनात जेव्हा आरोप लावले जातात तेव्हा उत्तर देणं आमची जबाबदारी आहे. जनतेसमोर सत्य यायला हवं. खोट्या आरोपांवर कोणी निवडणूक लढवणार असेल तर त्याचे स्पष्टीकरण देण्याची जबाबदारी आहे. आम्हाला आपचं काही करायची गरज नाही. 8 तारखेला मतदारच त्यांचे काय करायचे ते करतील. गुजरातच्या सर्व जागा जिंकायला हव्यात ही माझी तर जबाबदारी आहे. निवडणूक जिंकण्यासाठी लढली जाते हारण्यासाठी नाही," असे अमित शाह म्हणाले.
यावेळी पत्रकाराने अमित शाह यांचे राजकीय वजन वाढत असून शारिरीक वजन कमी होत आहे असे म्हटले. यावरही अमित शाह यांनी भाष्य केले. "माझी पत्नी इथेच बसलीय. त्यांना जरा नंतर विचारा वजन का आणि कसे कमी झालंय ते," असे अमित शाह म्हणाले.