'पैसे भरले नाही' म्हणून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यास रुग्णालयाचा नकार

मानवतेला काळिमा फासणारी ही घटना...

Updated: Feb 4, 2019, 07:40 PM IST
'पैसे भरले नाही' म्हणून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यास रुग्णालयाचा नकार title=

कामरान, रांची : मानवतेला काळिमा फासणारी एक घटना झारखंडची राजधानी असलेल्या रांची शहरात घडलीय. राजधानी रांचीच्या इचटी प्रखंड भागातील रहिवासी असलेल्या रुफिया खातून या महिलेचा रविवारी रात्री मृत्यू झाला. रांचीच्या गुरुनानक हॉस्पीटलमध्ये उपचारा दरम्यान रात्री ११ च्या सुमारास रुफिया खातून यांचा मृत्यू झाला. परंतु, कुटुंबीयांनी पैसे जमा करेपर्यंत या रुग्णालय प्रशासनानं महिलेच्या मृतदेहाला बंधक बनवून ठेवलं. 

२२ जानेवरी २०१९ रोजी आजारी असलेल्या रुफिया खातून यांना गुरु नानक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर कुटुंबीयांनी अगोदर मोदी सरकारनं गवगवा केलेल्या 'आयुष्मान योजने'चं कार्ड रुग्णालयाला दाखवलं. परंतु, या रुग्णालयानं आपण 'आयुष्मान योजनेत' रजिस्टर्ड नसल्याचं सांगत याद्वारे उपचार करण्यास साफ नकार दिला... आणि कुटुंबीयांना पैसे भरण्यास सांगितलं. 

कात्रीत सापडल्यानं कुटुंबीयांनी या महिलेला त्याच रुग्णालयात दाखल करायचं ठरवलं. परंतु, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूनंतर कुटुंबीय मृतदेह ताब्यात घेण्यास गेले तेव्हा रुग्णालय प्रशासनानं त्यांना 'पैसे न भरल्यानं' मृतदेह सोपवण्यास नकार दिला. 

यानंतर कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनाला आपली अडचण सांगून समजावण्याचा प्रयत्न केला... परंतु रुग्णालयाची पैशांची अट कायम राहिली. 

'झी मीडिया'ला याबद्दल माहिती मिळाल्यानंतर सामाजिक जबाबदारी म्हणून या घटनेची माहिती आमच्या प्रतिनिधींनी आरोग्य मंत्र्यांपर्यंत पोहचवली. यानंतर आरोग्य मंत्र्यांनी रुग्णालयाला फोन करून नियमांचं पालन करण्याची चेतावणी दिली. त्यानंतर रुग्णालय प्रशासनानं या महिलेचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला.