होळीवर कोरोनाचं सावट

चीनी तज्ज्ञांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा.   

Updated: Mar 9, 2020, 09:43 AM IST
होळीवर कोरोनाचं सावट  title=

मुंबई : सध्या संपूर्ण देशात होळीची तयारी जोरदार सुरू आहे. परंतू यंदाच्या होळीवर कोरोना व्हायरसचं सावट आहे. संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. तर या कोरोना व्हायरसवर चायनाच्या तज्ज्ञांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. होळी खेळल्यानंतर कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता अधिक असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. 
 
यंदाच्या वर्षी कोरोना व्हायरस होळीला लागलेलं ग्रहण आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. कोरोना व्हायरसमुळे भारतात चीनी वस्तुंना मागणी नसल्याचं चित्र आहे. कोरोना व्हायरसमुळे आता धुळवडीचा रंगदेखील बेरंग होताना दिसत आहे.  बाजारात चीनी रंगांना यंदा मागणी नाही. त्यामुळे दुकानदारांनीही नैसर्गिक रंगांवर भर दिला आहे. 

तर यंदा कोरोनामुळे धुळवडीसाठी गुलालाची मागणी जास्त असल्याचं विक्रेत्यांनी सांगितलंय. रविवारी केरळमध्ये कोरोनाचे ५ रूग्ण समोर आले आहेत. तर भारतात आतापर्यंत ३९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 

चीन नंतर इटलीमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत इटलीत २०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर जगभारातील मृतांचा आकडा ३ हजार ४०० वर पोहोचला आहे. ९० देशांतील १ लाखांहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.