बहुमत राखण्यासाठी १५ दिवसांत लग्न; सुनबाई थेट निवडणुकीच्या रिंगणात

नगरसेवकाच्या मुलाच्या लग्नाची कोणतीही चर्चा घरी नव्हती. पण, निवडणुकीचे गणित बिघडताच त्याला तातडीने लग्नाच्या घोड्यावर बसवण्यात आले.

Updated: Jun 3, 2018, 12:55 PM IST
बहुमत राखण्यासाठी १५ दिवसांत लग्न; सुनबाई थेट निवडणुकीच्या रिंगणात title=

हिसार: राजकीय आखाड्यात आपले बहुमत कायम ठेवण्यासाठी राजकीय नेते काय फंडे वापरतील याचा काही नेम नाही. हरियाणातील हिसार नगरपालिका निवडणुकीतही असाच प्रकार पहायला मिळाला. पालिका निवडणुकीत महिलांसाठी आरक्षण पडले. त्यामुळे एक तृतियांश वॉर्डामध्ये महिला उमेदवार देण्याची वेळ पक्ष आणि आघाड्यांवर आली. या प्रकारामुळे विजयावर दावा सांगणाऱ्या अनेकांचे गणित चांगलेच बिघडले. यावर मार्ग काढण्यासाठी कोणी बायकोला, कोणी आईला तर, कोणी नातेवाईक महिलेला रिंगणात उतरवण्यासाठी खटपटी करू लागला. पण, एका नगरसेवकाने या सर्वांवर कडी करत थेट आपल्या मुलाच्या लग्नाचाच घाट घाताला. या महाभागाने अवघ्या १५ दिवसांत चक्क मुलाचे लग्नही उरकले आणि नवदाम्पत्याला हनीमूनला पाठवण्याऐजी नव्या नवरीला थेट निवडणुकीच्या रिंगणातच उतरवले.

नो हनीमून ओन्ली निवडणूक प्रचार

त्याचे झाले असे, हिसार नगरपंचायतीचा वॉर्ड क्रमांक १० हा आतापर्यंत अनुसूचित जातींसाठी खुला आरक्षीत होता. मात्र, आता हाच वॉर्ड अनुसूचीत प्रवर्गातील महिला उमेदवारासाठी आरक्षीत झाला आहे. वॉर्डातील आरक्षण बदलल्याने सर्वच गणिते बदलली. त्यामुळे एका नगरसेवकाने आपला गड कायम राखण्यासाठी आपल्या मुलाचे अवघ्या १५ दिवसांत लग्न आटोपले. विशेष म्हणजे या नगरसेवकाच्या मुलाच्या लग्नाची कोणतीही चर्चा घरी नव्हती. पण, निवडणुकीचे गणित बिघडताच त्याला तातडीने लग्नाच्या घोड्यावर बसवण्यात आले. त्यासाठी नगरसेवक महोदयांनी एका सुशिक्षित वधूचाही शोध घेतला. अखेर विवाहाचे गणित जमले असून, सध्या हे नवदाम्पत्य हनिमूनला जाणे विसरून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.

पत्नीचे शिक्षण आडवे आले

प्रसारमाध्यमांतून आलेल्या वृत्तानुसार, हा प्रकार नगरसेवक अजीत सिंह यांच्याबाबत घडला आहे. अजीत सिंह हे आपला गड कायम राखण्यासाठी त्यांच्या पत्नीलाही रिंगणात उतरवू शकत होते. मात्र, पत्नीचे शिक्षण आडवे आले. अजीत सिंह यांच्या पत्नी निरक्षर असल्याने त्यांना निवडणूक लढवता येत नाही. यावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी आपल्या १२वी पास मुलाचा आधार घेतला. सिंह यांचा मुलगा रवी हा १२ पास असून तो एका खासगी कंपनीत काम करतो. वॉर्डातून उमेदवार निवडून आणायचा तरो तो घरातला असावा यासाठी मग अजित सिंह महोदयांनी मुलगा रवीचे लग्न केले आणि सुनबाईंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला.

सुनबाई करणार सासऱ्याचे स्वप्न साकार

२५ मे २०१८ रोजी रवी सिंह यांचे लग्न रोहतक जवळील कलानौरच्या ममता हिच्यासोबत झाले. अजित सिंह यांनी म्हटले आहे की, जे काम माझा मुलगा करू शकतो तेच काम सुनबाईही करू शकतात. आपल्या वॉर्डात आपण बरेच काम केले आहे. पण, अद्यापही बरेच काम बाकी आहे. आत तर, आमच्या सुनबाईही शिकलेल्या आहेत. त्यामुळे त्या आमचे काम पुढे चालवतील. अजित सिंह यांच्या सुनबाई ममतांनी सांगितले की, त्यांनी कलानौर येथील सरकारी शाळेतून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी एएनएमचा कोर्स केला. आता आपल्या शिक्षणासोबतच आपल्या सासऱ्यांचे ध्येय पूर्ण करण्याचे आपले स्वप्न असल्याचेही त्या सांगतात. महिलांचे आरोग्य आणि रोजार यावर आपला विशेष भर असेल असेही त्या सांगतात.