Islamic preacher Zakir Naik : वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर अब्दुल करीम नाईकने (Zakir Naik) पुन्हा एकदा भारताविषयी गरळ ओकली आहे. कथित मुस्लीम धर्मगुरू झाकीर नाईकचा सध्या भारताकडून (India) शोध घेतला जात आहे. 2016 साली झाकीर नाईकने भारतातून पळ काढला होता. आर्थिक गैरव्यवहार आणि समाजात द्वेष पसरवल्याचा आरोप झाकीर नाईकवर आहे. त्यानंतर आता फरार असलेल्या झाकीर नाईकने ओमानमध्ये 'कुराण जागतिक गरज' या व्याख्यानादरम्यान भारतातील हिंदूंबाबत (Hindu) वक्तव्य केले आहे. भारतातील बहुसंख्य हिंदू माझ्यावर प्रेम करतात असे विधान झाकीर नाईकने केले आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार, गुरुवारी ओमान कन्व्हेन्शन आणि एक्झिबिशन सेंटरमध्ये ( Oman Convention and Exhibition Centre) व्याख्यानादरम्यान झाकीर नाईकने हे वक्तव्य केले आहे. यावेळी भाषणादरम्यान झाकीर नाईकने बिहारचाही उल्लेख केला आहे. याआधीही झाकीर नाईकने हिंदू धर्माबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ओमानमध्ये केलेल्या वक्तव्याने नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
काय म्हणाला झाकीर नाईक?
"समस्या ही आहे की भारतातील बहुतेक हिंदू माझ्यावर प्रेम करतात. त्यांचे माझ्यावर इतके प्रेम आहे की त्यामुळे व्होट बँकेची अडचण निर्माण होत आहे. भारतात मी जेव्हा चर्चा आणि सभा देतो तेव्हा शेकडो, हजारो लोक असतात. बिहार आणि किशनगंजमध्ये 50 लाख ते 1 कोटी लोक असतात. विशेष म्हणजे त्यापैकी 20 टक्के गैर-मुस्लिम असतात," असे वक्तव्य झाकीर नाईकने भर व्याख्यानात केले आहे. जेव्हा ते माझ्याशी बोलतात तेव्हा ते मला झाकीर भाई म्हणतात, असेही नाईक म्हणाला.
#ZakirNaik Ikhwani was invited to #Oman to talk about Islam, BUT he tactfully used the opportunity to attack and defame #India and its Government.
Oman is India’s strong ally. But Islamists like Naik use religion to cover politics. This man sows discord in the… pic.twitter.com/OR89FmjhY9
— Zahack Tanvir - ضحاك تنوير (@zahacktanvir) March 24, 2023
शीख न्यायाधिशांनी ईडीला रोखले होते - झाकीर नाईक
"2018 मध्ये जेव्हा ईडी त्यांची मालमत्ता जप्त करण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा माझ्या भाषणात आक्षेपार्ह काहीही आढळले नाही असे एक शीख न्यायाधीश म्हणाले होते. जानेवारी 2018 मध्ये, नवी दिल्लीतील पीएमएलए (प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट) चे अध्यक्ष असलेल्या या न्यायाधीशांनी ईडीला नाईकच्या मालमत्ता ताब्यात घेण्यापासून रोखले होते. मी त्यांची अनेक भाषणे पाहिली आहेत, असे सरकारी वकिलाने सांगितले असता, तुम्ही मला अशी एक गोष्ट सांगा, जी दहशतवाद दर्शवते. तसे झाल्यास मी त्याची मालमत्ता जप्त करीन, असे त्या शीख न्यायाधिशांनी सांगितले होते," असेही झाकीर नाईक या कार्यक्रमात म्हणाला.
दरम्यान, झाकीर नाईक सध्या मलेशियामध्ये राहत आहे. 2016 मध्ये त्याच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (IRF) या संस्थेवर बंदी घातल्यानंतर तो भारतातून पळून गेला होता. 2019 मध्ये, त्याला मलेशियामध्ये त्याच्यावर सार्वजनिक ठिकाणी भाषण करण्यास बंदी घालण्यात आली होती. भारताव्यतिरिक्त बांगलादेश, कॅनडा, श्रीलंका आणि ब्रिटनमध्येही नाईकवर बंदी आहे.
दुसरीकडे, 19 नोव्हेंबर 2022 च्या मंगळुरु ऑटो बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी मोहम्मद शरीकने झाकीर नाईकच्या व्हिडिओने प्रभावित होऊन हे कृत्य केल्याची कबुली दिली होता. कर्नाटक पोलिसांनी अधिकार्यांनी शारिकचा मोबाईल जप्त केला होता ज्यात झाकीर नाईकचे व्हिडिओ होते.