निर्ल्लजपणाचा कळस; हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी गांधीजींच्या पुतळ्यावर झाडल्या गोळ्या

या विकृत कार्यकर्त्यांनी संबंधित प्रसंग पुनरुज्जीवित करण्याचा घाट घातला होता.

Updated: Jan 30, 2019, 10:32 PM IST
निर्ल्लजपणाचा कळस; हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी गांधीजींच्या पुतळ्यावर झाडल्या गोळ्या title=

लखनऊ: राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांना पुण्यतिथीनिमित्त बुधवारी देशभरात श्रद्धांजली वाहिली जात असताना हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या विकृतपणाने देशाला मान खाली घालायला लावली. अलिगढ येथील महात्मा गांधीजींच्या एका पुतळ्यावर गोळ्या झाडून शौर्यदिवस साजरा केला. आजच्याच दिवशी नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांची गोळ्या घालून हत्या केली होती. हिंदू महासभेकडून महात्मा गांधींच्या पुण्यतिथीच्या दिवशी शौर्यदिवस साजरा केला जातो. यासाठी या विकृत कार्यकर्त्यांनी संबंधित प्रसंग पुनरुज्जीवित करण्याचा घाट घातला. 

यावेळी हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सचिव पूजा शकून पांडेय यांनी महात्मा गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या चालवल्या. त्यानंतर प्रतिकात्मक पुतळ्याखाली रक्तही सांडल्याचे दाखवण्यात आले. याचवेळी नथुराम गोडसेच्या प्रतिमेला हार घालून त्यांचा जयजयकारही करण्यात आला.

महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणणे योग्य नाही. विजयादशमीला रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यामागे जी भावना असते, तीच आज आमच्यात होती. जर मी नथुराम गोडसेच्या आधी जन्मले असते, तर मीच महात्मा गांधी यांची हत्या केली असती, असे संतापजनक वक्तव्यही पूजा शकून पांडेय हिने केले. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अनेक विचारवंतांसह, सर्वसामान्यांकडून या घटनेचा निषेध करण्यात आला.