अहमदाबाद : गुजरातमधील पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल त्याच्या बालमैत्रिणीशी २७ जानेवारी रोजी लग्न करणार असल्याची माहिती मिळते आहे. हार्दिक पटेल बालमैत्रीण किंजल परिख हिच्याशी लग्नबंधनात अडकणार आहे. गुजरातमधील सुरेंद्रनगर तालुक्यातील दिगसर गावात जवळच्या नातेवाईक तसेच मित्रपरिवाराच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडणार आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक पटेलचे वडील भारत पटेल यांनी म्हटले आहे की, हार्दिक आणि किंजल बालपणापासून एकमेकांना ओळखत होते. दोघेही अहमदाबाद येथील विरामगम तालुक्यातील चंदननगरी गावात राहात होते. हार्दिक आणि किंजल यांच्या विवाहाला दोन्ही कुटुंबियांनी संमती दिली आहे.
येत्या २७ जानेवारीला हा लग्नसोहळा पार पडणार असल्याचे भारत पटेल यांनी सांगितले. तसेच, किंजल पाटीदार समाजातील नसल्याचे वाटू शकते. परंतु, ती पाटीदार समाजातीलच आहे म्हणून हा आंतरजातीय विवाह नसल्याचेही भारत पटेल यांनी स्पष्ट केले आहे.
किंजल परिख मूळची सूरतची आहे. काही वर्षांपूर्वीच ती विरामगम येथे राहण्यास आली होती. किंजल परिख हिने मेहसाना जिल्ह्यातील कढी तालुक्यातील कॉलेजमधून वाणिज्य शाखेची पदवी संपादन केली आहे. सध्या ती गांधीनगर येथून वकिलीचे शिक्षण घेते आहे.