अहमदाबाद : गुजरात विधासभेसाठी पार पडत असलेल्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी केवळ चारच दिवस बाकी आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांनी सर्व लक्ष प्रचारावर केंद्रीत केले आहे. पंतप्रधान मोदींनी तर, आपल्या घरच्या मैदानावर जोरदार कंबर कसली असून, एकामागून एक अशा सभांचा धडाकाच लावला आहे.
मोदी गुजरातमध्ये 50 सभा घेणार असल्याचे सांगितले जाते आहे. मात्र, घरच्या मैदानावर राहुल गांधी आणि कॉंग्रेसने उभा केलेले आव्हान पाहता भाजप जोरदारपणे कामाला लागला आहे. त्यामुळे स्वत: मोदीही प्रचारात लक्ष घालत असून, सभांमागून सभा घेत आहेत. त्यांनी आपले सर्व लक्ष सौराष्ट्रकडे वळवले आहे. आपल्या भाषणांमधून मोदी पक्ष कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास भरत असले तरी, कॉंग्रेसचे तगडे आव्हान पाहून भाजपच्या वर्तुळात अस्वस्थता असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत सर्वांचं लक्ष लागलंय ते मोठ्या संख्येनं असलेल्या पाटीदार समाजाच्या भूमिकेकडे. पाटीदार आरक्षण संघटनेचे नेते हार्दिक पटेल यांनी थेट निवडणुकीत भाग घेतला नसला तरी त्यांनी भाजपविरोधात जोरदार प्रचार सुरू केलाय. त्यांच्या सभा आणि रॅलींना सर्वच ठिकाणी जोरदार प्रतिसाद मिळतोय. त्यामुळं भाजपच्या सत्तेचं समीकरण ते बिघडवण्याची शक्यता आहे.