जागा 5, उमेदवार हजारो, खासगी कंपनीच्या मुलाखतीत चेंगराचेंगरी... धडकी भरवणारा Video

Viral Video : परदेशी कंपन्यांची गुंतवणूक, लाखोंचा रोजगार अशा कितीही वल्गना केल्या तरी प्रत्यक्षात देशात बेराजगारांची संख्या लक्षणीय आहे. याचं धडधडीत उदाहरण गुजरातमध्ये पाहायला मिळालंय. एका खासगी कंपनीत पाच जागांसाठी हजारो तरुणांनी गर्दी केली होती.  

राजीव कासले | Updated: Jul 11, 2024, 06:53 PM IST
जागा 5,  उमेदवार हजारो, खासगी कंपनीच्या मुलाखतीत चेंगराचेंगरी... धडकी भरवणारा Video title=

Job Interview : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका खासगी कंपनीत (Private Company) मुलाखत देण्यासाठी हजारो तरुणांनी गर्दी केल्याचं या पाहायला मिळतंय. मुलाखतीसाठी आपला नंबर लागावा यासाठी तरुण एकमेकांना धक्काबूक्की करताना दिसत आहेत. तरुणांची गर्दी इतकी वाढली की गर्दीने रेलिंगही वाकलं. धडकी भरवणारा हा व्हिडिओ गुजरातमधल्या अंकलेश्वरमधला (Ankleshwar) आहे. या व्हिडिओत हजारो बेरोजगार तरुण नोकरी मिळवण्यासाठी धडपड करताना दिसतायत. या कंपनीत वॉक-इन-इंटरव्ह्यू (Walk-In-Interview) आयोजित करण्यात आला होता. 

काय आहे नेमकी घटना
मिळालेल्या माहितीनुसार अंकलेश्वरच्या लॉर्डस प्लाझा हॉटेलमध्ये थर्मेक्स कंपनीने नोकरीसाठी जाहीरात दिली. जाहीरातीत दिल्याप्रमाणे थर्मेक्स कंपनीत पाच जागांसाठी वॉक-इन-इंटरव्ह्यू ठेवण्यात आला होता. यासाठी कंपनीचं एक पॅनेल लॉर्ड्स प्लाझा हॉटेलमध्ये मुलाखत घेत होतं. पण ही जाहीरात इतकी पसरली की मुलाखतीसाठी लॉर्ड्स प्लाझा हॉटेलबाहेर हजारो तरुणांची गर्दी झाली. बघता बघता गर्दी नियंत्रणाच्या बाहेर गेली.

गर्दी नियंत्रणाच्या बाहेर
पाच जागांसाठी हजारो तरुणांची गर्दी होईल याचा अंदाज कंपनीला आला नाही. गर्दी नियंत्रित करण्यासाठी तिथे कोणतीच व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे गर्दी अनियंत्रित झाली. यात पुढे जाण्याची चढाओढ सुरु झाली आणि यातून धक्काबुकीची घटना घडली. गर्दीमुळे मुलाखतीवरही परिणाम झाला. 

कंपनीच्या गेटवर धक्काबुक्की
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत मुलाखतीसाठी आलेले तरुण कंपनीच्या गेटवर धक्काबुक्की आणि हॉटेलच्या सुरक्षारक्षकांबरोबर वाद घालताना दिसत आहेत. आपल्याला कंपनीनेच फोन करुन मुलाखतीला बोलवालं पण आता आत जाण्याच मनाई केली जात असल्याचं काही तरुणांनी सांगितलं. याप्रकरणी कंपनीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

देशात बेरोजगारीची समस्या
परदेशी कंपन्यांची गुंतवणूक आणि लाखोंचा रोजगार उपलब्ध होईल असं सांगितलं जातं. पण प्रत्यक्षात चित्र वेगळंच आहे. आजही देशात लाखोने बेरोजगार तरुण आहेत. काही दिवसांपूर्वीच एका राज्यात शिपाई, माळीच्या जॉबसाठी पदवीधर, इंजीनिअर तरुणींचे अर्ज आल्याची घटना घडली होती.