अहमदाबाद : गुजरातमध्ये ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. गुजरातमधल्या कच्छ (Kachchh) इथल्या मुंद्रा पोर्टवर (Mundra Port) दोन कंटेनरमधून 3 हजार किलो हेरॉईन जप्त करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत तब्बल 8 कोटी ते 9 हजार कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. डीआरआयच्या (Directorate of Revenue Intelligence) माध्यमातून गांधीधाम, मांडवी, अहमदाबाद, चेन्नई आणि दिल्लीपर्यंत छापेमारी करण्यात आली.
या प्रकरणात आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे. या ड्रग्ज तस्करीत मोठं रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. हे हेरॉईन अफगानिस्तानातून आणल्याची माहिती मिळत आहे.
डीआरआयच्या (DRI) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रग्ज घेऊन जाणारे कंटेनर आंध्र प्रदेशातील विजयवाडा (Vijaywada) इथल्या एका फर्मने आयात केले होते आणि फर्मने हा माल 'टाल्कम पावडर' (Talcum Powder) असल्याचं सांगितलं होतं. तर अफगाणिस्तानमधील कंधार इथं असलेल्या हसन हुसेन लिमिटेड या फर्मने हा सर्व माल निर्यात केला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
डीआरआय आणि कस्टमने गेल्या पाच दिवसांपासून सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं. या कारवाईदरम्यान, मुंद्र पोर्टवरील दोन कंटेनरच्या तपासात 9 हजार करोड रुपयांचं ड्रग्स जप्त करण्यात आलं. यानंतर देशातील पाच शहरांमध्ये तपास सुरु करण्यात आला.