नवी दिल्ली : गुजरात राज्यसभा निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळाली. काँग्रेसने भाजपला दे धक्का दिला आणि आपली जागा कायम राखली. आपल्या विजयानंतर अहमद पटेल यांनी 'सत्यमेव जयते' असे ट्विट केले.
सत्यमेव जयते
— Ahmed Patel (@ahmedpatel) August 8, 2017
प्रतिष्ठेच्या लढाईत काँग्रेसने भाजपवर मात केली आहे. काँग्रेसच्या अहमद पटेल यांनी बलवंतसिंह राजपूत यांचा पराभव केला असून त्यांना ४४ मते मिळाली. गुजरातमधील तीन जागांसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये घमासान पाहायला मिळाले. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या चाणक्यांमधील लढाईत अखेर काँग्रेसने बाजी मारली आहे. अहमद पटेल यांच्या विजयासाठी काँग्रेसने जोरदार झुंज दिली होती. या विजयामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
This is not just my victory. It is a defeat of the most blatant use of money power,muscle power and abuse of state machinery
— Ahmed Patel (@ahmedpatel) August 8, 2017
गुजरातच्या विधानसभेत भाजपचे १२१ आमदार आहेत. या संख्याबळाच्या आधारे भाजपचे २ उमेदवार सहज राज्यसभेवर जाऊ शकत होते. मात्र भाजपने ३ उमेदवार रिंगणात उतरवले. त्यामुळे काँग्रेसच्या अहमद पटेल यांच्यासमोर आव्हान निर्माण झाले. काँग्रेसकडे पटेल यांना राज्यसभेत पाठवण्यासाठी आवश्यक असलेले संख्याबळ होते. मात्र निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या ६ आमदारांनी पक्षाला रामराम केला. त्यामुळे पटेल यांची राज्यसभेची वाट आणखी बिकट झाली होती.